Karuna Jain Retires: भारतीय महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक करुणा जैननं (Karuna Jain) रविवारी वयाच्या 36 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. बेंगळुरू येथे जन्मलेल्या करुणानं तिच्या कारकिर्दीत भारत, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि दक्षिण विभागाचं प्रतिनिधित्व केलंय. करुणानं नोव्हेंबर 2005 मध्ये दिल्लीत इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तिनं 5 कसोटी सामन्यात 195 धावा केल्या आहेत. यादरम्यान 40 धावा ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या होती. 


करुणानं तिच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध वर्म्सले येथे खेळला होता. "मी अतिशय आनंदी आणि समाधानी भावनांसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करते आणि खेळासाठी काहीतरी योगदान देण्यासाठी उत्सुक आहे", असं करुणानं निवृत्ती जाहीर करताना म्हटलंय. यादरम्यान तिनं बीसीसीआय, एअर इंडिया, कर्नाटक, पुद्दुचेरी यांचेही आभार मानले आहेत. "यापैकी प्रत्येकानं महाला खेळ आणि जीवनाबद्दल काहीतरी वेगळं शिकवलं आणि आज मी जे काही आहे, त्यांच्यामुळंचं आहे", असंही तिनं म्हटलंय.


ट्वीट-



करुणाची कारकीर्द
करुणानं 44 एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. ज्यात एक शतक आणि 9 अर्धशतकाच्या मदतीनं 987 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील 103 ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या होती. तिनं 2004 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, तर, 2014 मध्ये इंग्लंड विरुद्ध शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पाकिस्तानविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या करुणानं भारताकडून 9 टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत. करुणानं तिच्या कसोटी कारकिर्दीत 17 विकेट घेतल्या, जी अंजू जैनच्या 23 नंतर भारतीय महिला यष्टीरक्षकाची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.


हे देखील वाचा-