England vs India Test Update : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत पहिल्याच दिवशी ऋषभ पंत दुखापतीला सामोरे जावे लागले. बॉल थेट त्याच्या पायाच्या बोटावर लागल्याने फ्रॅक्चर झालं असून, डॉक्टरांनी किमान 6 आठवड्यांचा विश्रांतीचा सल्ला दिला आहे.  यादरम्यान, बीसीसीआयने माहिती दिली आहे की, ऋषभ पंत फलंदाजीसाठी उपलब्ध असणार आहे. पण, तो विकेटकीपिंग करणार नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेल विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळेल. ऋषभ पंतने लंगडत बिनधास्त बॅटिंग करत 75 चेंडूत 54 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार आले. 

इशान किशनचा झालाय अपघात, पायाला 10 टाके, नेमकं काय घडलं?

दरम्यान, इशान किशन ऋषभ पंतला रिप्लेस करणार अशी देशभर चर्चा झाली. बीसीसीआयने त्याच्या जागी विकेटकीपर म्हणून इशान किशन याला टीममध्ये घेण्याचा विचार केला होता. पण टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार इशानसुद्धा सध्या फिट नाही. मिळालेल्या माहितीनुसार, इशान किशनचा अपघात झालाय, तो स्कूटीवरून घसरून पडला. ज्यामध्ये त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्याच्या पायाला 10 टाके घालावे लागले. सध्या टाके काढण्यात आले असले तरी त्याच्या पायावर अजूनही प्लास्टर आहे. त्यामुळे इशान लवकरात लवकर मैदानात परतू शकणार नाही, हे जवळपास निश्चित झालं आहे.

आता पंतच्या जागी कोण? 

क्रिकबझच्या माहितीनुसार, आता टीम इंडिया ऋषभ पंतच्या जागी नारायण जगदीशन याला संधी देणार आहे. 29 वर्षांच्या या तामिळनाडूच्या फलंदाजाने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने 48 च्या सरासरीने 3373 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 10 शतकं आणि 14 अर्धशतकं समाविष्ट आहेत. मँचेस्टर कसोटीत ध्रुव जुरेल यष्टीमागे भूमिका बजावत असून, ओव्हल कसोटीतही त्याच्यावरच विश्वास ठेवला जाण्याची शक्यता आहे. नारायण जगदीशन ‘बॅकअप विकेटकीपर’ म्हणून संघात सामील होईल.

पंतने लंगडतही ठोकलं अर्धशतक

पहिल्या दिवसाच्या अखेरीस पंत 37 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्याने मैदानात परत येऊन लंगडत इंग्लिश गोलंदाजांना पुन्हा एकदा उत्तर दिलं. पाय दुखत असूनही त्याने 54 धावांची दमदार खेळी साकारली. मात्र, विकेटकीपिंग करणे शक्य नसल्याने त्याऐवजी ध्रुव जुरेल याने कीपिंगची जबाबदारी पार पाडली.