England vs India 4th Test Update : मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 358 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी भारताकडून ऋषभ पंतने अर्धशतक ठोकले, तो काल (बुधवार) 37 धावांवर रिटायर हर्ट झाला होता. ऋषभ पंतने लंगडत बिनधास्त बॅटिंग करत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपले. पंतने 75 चेंडूत 54 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार आले. पंत व्यतिरिक्त साई सुदर्शनने 61 आणि यशस्वी जैस्वालने 58 धावा केल्या. त्याच वेळी इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने 5 विकेट घेतले.

ऋषभ पंतने इतिहास रचला

ऋषभ पंतने पायाला दुखापत असताना अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे. तो आता इंग्लंडमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. इंग्लंडमध्ये हा त्याचे पाचवे अर्धशतक होते. पंतने एमएस धोनी आणि फारुख इंजिनिअरला मागे टाकले आहे. धोनी आणि फारुखने प्रत्येकी चार 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

टीम इंडियाच्या पहिल्या डावात काय घडलं? 

चौथ्या कसोटीत नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. 98 चेंडूत 4 चौकारांसह 46 धावा काढल्यानंतर केएल राहुल बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या साई सुदर्शननेही अर्धशतक झळकावले आणि यशस्वी जैस्वालनेही अर्धशतक झळकावले.

जैस्वालने 107 चेंडूत 58 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि एक षटकार आला. साई सुदर्शनने 151 चेंडूत 7 चौकारांसह 61 धावा केल्या. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक होते. दुसरीकडे, कर्णधार शुभमन गिलची बॅट शांत राहिली. तो फक्त 12 धावा करू शकला.

पहिल्या दिवशी 37 धावांवर जखमी झालेल्या ऋषभ पंतने 75 चेंडूत 54 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने 20 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने 41 धावांची आणि वॉशिंग्टन सुंदरने 27 धावांची महत्त्वाची खेळी केली. अंशुल कंबोज 00 धावांवर आणि जसप्रीत बुमराह चार धावांवर बाद झाला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने 72 धावांत पाच बळी घेतले. त्याच वेळी जोफ्रा आर्चरने 73 धावांत 3 भारतीय फलंदाज बाद केले. याशिवाय लियाम डॉसन आणि ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

हे ही वाचा -

IND vs ENG Youth Test : आयुष म्हात्रेचा इंग्लंडविरुद्ध धमाका, सलग दोन झंझावाती शतकं, वैभव सूर्यवंशी मात्र पुन्हा फेल!