IND vs ENG Oval Test Umpire Kumar Dharmasena helped England : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली कसोटी मालिका सध्या वादांच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रत्येक सामन्यात काही ना काही वादग्रस्त घडामोडी घडत आहेत. ओव्हल कसोटीच्या पहिल्याच दिवशी श्रीलंकेचे अनुभवी अंपायर कुमार धर्मसेना यांनी केलेल्या एका हालचालीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
झालं असं की, जेव्हा इंग्लंडचा गोलंदाज जोश टंग साई सुदर्शनला चेंडू टाकत होता, तेव्हा एक चेंडू प्रचंड स्विंग होऊन थेट साईच्या पॅडवर लागला. इंग्लंडच्या खेळाडूंनी लगेच जोरदार अपील केली. पण इंग्लंडचा कर्णधार ओली पोप रिव्ह्यू घेणार की नाही, याचा निर्णय घेत असतानाच अंपायर धर्मसेनांनी हाताने बॅट लागल्याचा इशारा केला. यामुळे इंग्लंडचा रिव्ह्यू वाचला. मात्र, सोशल मीडियावर यावरून तुफान वाद उसळला. धर्मसेनांवर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला.
अंपायरिंगवरून सोशल मीडियावर संताप
या घटनेनंतर सोशल मीडियावर धर्मसेनांना टार्गेट केलं जात आहे. चाहते म्हणतायत की, अशा प्रकारे स्पष्ट इशारा देणे म्हणजे थेट इंग्लंडला मदत करणं. याआधीही या मालिकेत अंपायरिंगच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. विशेषतः क्रिस गॅफनी यांच्यावरही आरोप झाले होते की, इंग्लंडसाठी सहज आउट देणारे हे अंपायर भारताच्या गोलंदाजीच्या वेळी मात्र अगदी स्थिर उभे असतात.
लॉर्ड्समध्ये चेंडू बदलावरून वाद
लॉर्ड्स कसोटीतही वाद झाला होता. भारताने चेंडू खूप जुना झाल्याची तक्रार करत चेंडू बदलण्याची मागणी केली होती. मात्र अंपायरांनी 10 ओव्हर जुना चेंडू असताना अधिक जुनाच चेंडू दिला. यामुळे सामन्याच्या प्रवाहावर परिणाम झाला आणि भारताला 20-30 धावांचे नुकसान सहन करावे लागले. नंतर जेव्हा चेंडू बदलण्यात आला, तेव्हा लगेच भारताला विकेट्स मिळाल्या. यावरूनच बीसीसीआयने थेट आयसीसीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
सतत अंपायरिंगच्या निर्णयांवर शंका
या संपूर्ण मालिकेत अंपायरिंगवर सतत शंका घेतली जात आहे. बॉल ट्रॅकिंग सिस्टम, डीआरएस निर्णय, चेंडू बदलणे अशा अनेक बाबतीत भारतावर अन्याय झाल्याचं चित्र आहे. अंपायरांच्या या कामगिरीमुळे या कसोटी मालिकेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. संपूर्ण मालिकेत अंपायरिंगचा दर्जा आणि निष्पक्षता मोठ्या वादाचा विषय ठरत आहे, आणि आता आयसीसी पुढील कारवाई करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा -