India vs Australia Women's T20 World Cup 2024 : यावेळी युएईमध्ये महिला टी-20 वर्ल्ड कप 2024चा थरार रंगला आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघासमोर 152 धावांचे लक्ष्य होते. टीम इंडियाला 20 षटकात 9 विकेट्सवर केवळ 142 धावा करता आल्या आणि सामना 9 धावांनी गमवावा लागला. या पराभवानंतर आता भारतीय संघाला उपांत्य फेरी खेळणे जवळपास कठीण झाले आहे.
या सामन्यात ॲलिसा हिलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन महिला संघाचे कर्णधार असलेल्या ताहलिया मॅकग्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने 20 षटकात 8 गडी गमावून 151 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीवीर ग्रेस हॅरिसने 40 धावा केल्या तर कर्णधार ताहलिया मॅकग्रा आणि एलिस पेरीने प्रत्येकी 32 धावा केल्या. टीम इंडियाकडून गोलंदाजीत रेणुका सिंग आणि दीप्ती यांनी 2-2 विकेट घेतल्या तर श्रेयंका, पूजा आणि राधा यादव यांनी 1-1 विकेट घेतली.
152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला वेगवान सुरुवात झाली. मात्र ठराविक अंतराने विकेट पडल्यामुळे ही धावसंख्या गाठण्यात संघाला यश आले नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरने 47 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी नक्कीच केली होती, पण ती संघाला विजयापर्यंत नेण्यात यशस्वी होऊ शकली नाही. यासह टीम इंडियाचे स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्नही जवळपास भंगले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना सोफी मोलिनक्स आणि ॲनाबेल सदरलँड यांनी 2-2 विकेट घेतल्या, तर मेगन शुट आणि ॲशले गार्डनर यांनी 1-1 विकेट घेतली.
पाकिस्तानच्या विजयासाठी भारतीयांचे देव पाण्यात, जाणून घ्या समीकरण
भारतीय संघ अद्याप उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेला नाही. टीम इंडियाला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर भारतीय संघासाठी काही चित्र स्पष्ट होणार आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये जायचे असेल तर पाकिस्तानला न्यूझीलंड संघाचा पराभव करावा लागेल. याशिवाय भारताचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा चांगला असायला हवा.
वर्ल्ड कप 2024 मधील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर भारतीय संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला. पण ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाला शेवटच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
हे ही वाचा -
Mumbai Indians : लिलावाआधी मुंबई इंडियन्सने उचलले मोठे पाऊल; रोहित शर्मा पुन्हा होणार कर्णधार?