Team India Squad for Sri lanka Series : श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या टी20 आणि वनडे संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी20 संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर शुभमन गिल याला वनडे आणि टी20 संघाचं उपकर्णधारपद दिले आहे. त्याशिवाय विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याचं वनडे संघात कमबॅक झालेय. रियान पराग याला वनडे आणि टी20 संघात स्थान देण्यात आले आहे. पण संघ निवड करताना निवड समितीने ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांच्यासोबत अन्याय केलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात या दोन्ही खेळाडूंनी शानदार कामगिरी केली होती. पण तरीही त्यांना डावलण्यात आले आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टी20 संघामधून अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, आवेश खान आणि मुकेश कुमार यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
ऋतुराज गायकवाडचं काय चुकलं ?
झिम्बाब्वे दौऱ्यात अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी शानदार कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले होते. सलामीचा स्लॉट सोडून इतर क्रमांकावर फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला होता. असे असतानाही श्रीलंका दौऱ्यात ऋतुराजला वनडे अथवा टी0 संघात स्थान मिळाले नाही. ऋतुराज गायकवाडचं नेमकं कुठं चुकलं? असा सवाल चाहत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
अभिषेक शर्माने झिम्बाब्वे दौऱ्यात भारताच्या टी20 संघात पदार्पण केले. पदार्पणानंतर दुसऱ्याच सामन्यात अभिषेक शर्माने शानदार शतक ठोकले होते. त्याशिवाय ऋतुराज गायकवाडने फटकेबाजी करत आपण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकतो? असा सूचक इशारा दिला होता. झिम्बाब्वे दौऱ्यात ऋतुराजची फलंदाजी पाहून चाहत्यांनी आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा विश्वासू फलंदाज मिळाला अशा कमेंट्सही केल्या होत्या. काहींनी ऋतुराजची तुलना विराट कोहलीसोबत केली होती. विराट जसा टी20 मध्ये डावाला आकार देतो, तीच कला ऋतुराजकडे असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. पण सगळं काही असतानाही डावलण्यात का आलं? असा सवाल चाहत्यांच्या मनात आहे.
खराब कामगिरीनंतरही रियान परागला संधी
झिम्बाब्वे दौऱ्यात रियान पराग याला मोठी खेळी करता आली नाही. त्याला तीन सामन्यातील दोन डावात फक्त 24 धावाच करता आल्या. त्यामध्ये 22 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पण तरीही रियान पराग याला श्रीलंका दौऱ्यासाठी टी20 आणि वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. खराब कामगिरीनंतरही निवड समितीने रियान पराग याच्यावर का विश्वास दाखवला? ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माचं कुठं चुकलं? असा सवाल चाहत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
केएल राहुल आणि श्रेयरचं वनडेत कमबॅक -
केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या अनुभवी फलंदाजांना वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यालाही वनडेचं तिकिट मिळाले आहे. संजू सॅमसन याला फक्त टी20 संघात स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला वनडेचं तिकिट मिळालं आहे.