Kuldeep Yadav released from India’s T20I Squad : सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. 2 नोव्हेंबरला होबार्ट येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेटने विजय मिळवला. या मालिकेत डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव संघात असला तरी त्याला तिसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. आता बीसीसीआयने त्याला मालिकेच्या मध्यातच टीम इंडियाच्या स्क्वॉडमधून रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो आता भारतात परतणार आहे.
बीसीसीआयचा मोठा निर्णय! काय आहे कारण?
भारतीय संघाला 14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेच्या तयारीसाठी बीसीसीआयने कुलदीप यादवला लवकर भारतात परत बोलावले आहे. बोर्डाकडून जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, कुलदीप भारतात परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध चालू असलेल्या अनऑफिशियल कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारत ‘अ’ संघाकडून खेळणार आहे. हा सामना 6 नोव्हेंबरला बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात खेळल्यामुळे कुलदीपला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी आपली तयारी अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल.
के.एल. राहुल अन् मोहम्मद सिराजही खेळणार
भारत आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांमध्ये 2 अनऑफिशियल कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेत ऋषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. पहिला सामना भारताने 3 विकेटने जिंकला. आता दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि के.एल. राहुल हेही प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार आहेत.
दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), केएल राहुल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर ब्रार, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कुलदीप यादव.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या T20 साठी टीम इंडियाचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
हे ही वाचा -