IND-W vs AUS-W 3rd ODI Team India in Pink Jersey : भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना शनिवार 20 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर खेळला जात आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे विजेत्यासाठी ही लढत निर्णायक ठरेल. या निर्णायक लढतीत भारतीय महिला संघ एका नव्या रुपात मैदानात उतरला आहे. नेहमीची निळी जर्सी बाजूला ठेवून टीम इंडिया गुलाबी जर्सी परिधान करून खेळत आहे. यामागे बीसीसीआय आणि एसबीआय लाइफ यांची एक खास मोहीम आहे. उद्देश आहे स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करणे.
हरमनप्रीत कौर काय म्हणाली?
टॉसच्या वेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर गुलाबी टी-शर्टमध्येच मैदानात आल्या. सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत हरमनप्रीत म्हणाली की, "आम्ही रोज अनिश्चित परिस्थितीसाठी स्वतःला तयार करत असतो. ही गुलाबी जर्सी आम्हाला आठवण करून देते की आपण सदैव सज्ज राहायला हवं. चला, स्तन तपासणीला आपल्या मासिक दिनचर्येचा भाग बनवू आणि कर्करोगाविरोधात उभे राहू." हा पहिलाच प्रसंग नाही, जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने जर्सीद्वारे सामाजिक संदेश दिला आहे. 2016 मध्ये पुरुष संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आईच्या नावाने जर्सी परिधान केली होती. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली म्हणून खेळाडूंनी कॅमोफ्लाज कॅप घातली होती.
वर्ल्ड कप 2025 पूर्वीची सरावाची संधी...
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 281 धावांचे लक्ष्य सहज गाठून विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन केले. स्मृती मानधनाच्या शतकी खेळी आणि गोलंदाजांच्या भक्कम प्रदर्शनाच्या जोरावर भारताने 102 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला.
आता या मालिकेचा तिसरा सामना भारतासाठी केवळ मालिकेचा निकाल ठरवणारा नाही, तर वर्ल्ड कप 2025 पूर्वीची एक महत्त्वाची सरावाची संधीही आहे. जर भारताने ही मालिका जिंकली, तर हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिलाच वनडे मालिकाविजय ठरेल. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया नक्कीच आत्मविश्वासाने भारलेली आहे.
हे ही वाचा -