Shubman Gill Travis Head Catch : दुबईच्या मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला उपांत्य सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडत आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकली. आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पुन्हा एकदा ट्रॅव्हिस हेडने टीम इंडियाला घाम फोडला होता.
पण भारताचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात ट्रॅव्हिस हेड अडकला. भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने त्याचा शानदार झेल घेतला. हेड आऊट होताच टीम इंडियाने मैदानावर जोरात जल्लोष करायला सुरुवात केली आणि चाहते स्टेडियममध्ये नाचू लागले. मैदानापासून ते सोशल मीडियापर्यंत टीम इंडियाचे चाहते या विकेटचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली.
गिलच्या सेलिब्रेशनवरून वाद
दरम्यान, मैदानावर असे काही घडले, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. हेडचा झेल घेतल्यानंतर शुभमन गिलला पंचांनी इशारा दिला. सुरुवातीला लोकांना हे प्रकरण समजले नाही. पण जेव्हा टीव्ही रिप्ले दाखवण्यात आला तेव्हा सर्व काही स्पष्ट झाले. वरुणचा चेंडू पकडल्यानंतर गिलने लगेचच त्याच्या हातातून चेंडू खाली फेकला आणि आनंद साजरा करण्यास सुरुवात केली.
गिलला मिळाला इशारा
शुभमन गिलची ही कृती पंचांनी पाहिली. हेड पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर मैदानावरील पंचांनी गिलला बोलावून इशारा दिला. चेंडू पकडल्यानंतर त्याला काही क्षण हातात ठेवण्यास सांगण्यात आले. गिलने पंचांचा सल्ला ऐकला आणि प्रकरण तिथेच संपले.
ट्रॅव्हिस हेडची तूफानी फटकेबाजी
ट्रॅव्हिस हेडने नेहमीच भारताविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, या सामन्यात तो मोठी खेळी खेळू शकला नाही. त्याने वरुणने बाद होण्यापूर्वी 33 चेंडूत 39 धावा केल्या. या काळात हेडच्या बॅटमधून पाच चौकार आणि दोन षटकार मारले. जखमी मॅथ्यू शॉर्टच्या जागी संघात आलेला कूपर कॉनोली काही खास कामगिरी करू शकला नाही. पदार्पणाच्या सामन्यात तो नऊ चेंडूंचा सामना करूनही खाते उघडू शकला नाही. मोहम्मद शमीच्या चेंडूवर तो यष्टिरक्षक केएल राहुलने झेलबाद झाला.
दोन्ही संघांची प्लेइंग-11
ऑस्ट्रेलिया : कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.