Jasprit Bumrah released from India squad : लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाआधी बीसीसीआयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत टीम इंडियाच्या एक स्टार खेळाडूला स्क्वॉडमधून रिलीज केल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, या खेळाडूचा समावेश ओव्हल कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये झाला नव्हता.
बीसीसीआयचा मोठा निर्णय
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कसोटी मालिकेच्या दरम्यानच टीममधून रिलीज करण्यात आले आहे. बीसीसीआयने बुमराहचा वर्कलोड लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. या मालिकेत बुमराहने तीन कसोटी सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करत 14 विकेट घेतले आणि भारतीय गोलंदाजीचा कणा ठरला. मात्र, मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीत त्याच्या वेगात घट झाल्याचे जाणवले, त्यामुळे वैद्यकीय टीमने त्याला विश्रांती देण्याचा सल्ला दिला.
या मालिकेच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट झाले होते की, बुमराह फक्त तीन कसोटी सामने खेळणार आहे. त्याच्या पाठीच्या जुन्या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंट कोणताही धोका पत्करायला तयार नव्हते. ओव्हल कसोटीत बुमराहच्या जागी आकाश दीपला संधी देण्यात आली आहे, जो नुकताच दुखापतीमधून सावरला आहे.
मालिकेतील बुमराहची कामगिरी
जसप्रीत बुमराहने या मालिकेत लॉर्ड्स, हेडिंग्ले आणि मँचेस्टर कसोटीत खेळला आणि आपल्या अचूक यॉर्कर्स व स्विंगमुळे इंग्लिश फलंदाजांना अक्षरशः हैराण केलं. मँचेस्टर सामन्यात त्याने 33 षटकांत फक्त दोन बळी घेतले, पण त्याची उपस्थिती ही भारतीय गोलंदाजीसाठी खूप महत्त्वाची ठरली. हा सामना अनिर्णित राहिला होता. सध्या भारत 1-2 ने मालिकेत पिछाडीवर आहे आणि ओव्हल कसोटी जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत आणण्याचा संघाचा प्रयत्न आहे.
सामन्याबद्दल बोलयाचे झाले तर, ओव्हल कसोटीत भारताचा पहिला डाव 224 धावांवर संपला. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडिया जास्त षटके खेळू शकली नाही आणि भारताने शेवटचे 4 विकेट अवघ्या 20 धावांत गमावले. भारताकडून अर्धशतक करणारा एकमेव फलंदाज करुण नायर होता, ज्याने 57 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सनने पाच विकेट घेतल्या. अॅटकिन्सनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही चौथी वेळ आहे.
हे ही वाचा -