England vs India 5th Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रंगत चांगलीच वाढली आहे. मात्र या निर्णायक सामन्यात इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अनुभवी वेगवान गोलंदाज क्रिस वोक्स यांना दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी फील्डिंग दरम्यान वोक्सला खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. तत्काळ वैद्यकीय तपासणीनंतर इंग्लंडच्या मेडिकल टीमने त्याला ‘अनफिट’ घोषित केले. त्यामुळे वोक्स उर्वरित सामन्यात सहभागी होऊ शकणार नाहीत.
ऋषभ पंतला फ्रॅक्चर करणारा गोलंदाज पाचव्या कसोटीतून बाहेर
गंमत म्हणजे, याच वोक्सने चौथ्या कसोटीत भारताचा स्टार यष्टिरक्षक ऋषभ पंतला दुखापतग्रस्त केलं होतं, आणि आता खुद्द वोक्सच दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेले आहेत. भारताला मँचेस्टर कसोटीत जसा धक्का बसला होता, तसाच झटका आता इंग्लंडलाही ओव्हल कसोटीत सहन करावा लागतोय.
वोक्सच्या गैरहजेरीमुळे इंग्लंड संकटात
क्रिस वोक्स हा या मालिकेत इंग्लंडच्या एकमेव असा खेळाडू होता, जो सर्व सामन्यांमध्ये खेळला होता. पहिल्याच दिवशी त्याने के.एल. राहुल आऊट केले होते. मात्र त्यानंतर त्याला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर आता संघात त्याची उणीव स्पष्टपणे जाणवणार आहे.
या मालिकेतील वोक्सचा फॉर्म अत्यंत निराशाजनक राहिला आहे. इंग्लंडमध्ये स्विंगचा बादशहा मानला जाणारा वोक्स या मालिकेत फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. पाच सामन्यांमध्ये त्याला फक्त 11 विकेट घेता आल्या, फलंदाजीतही त्याने फार काही योगदान दिलं नाही आणि अखेरच्या सामन्यात तर तो दुखापतीमुळे बाहेर गेला आहे.
पहिल्या दिवशी इंग्लिश गोलंदाजांची बाजी
ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या इंग्लंडला गस ॲटकिन्सनने जबरदस्त सुरुवात करून दिली. त्याने यशस्वी जैस्वालला केवळ 2 धावांवर बाद केलं. त्यानंतर के.एल. राहुल 14 धावा करून वोक्सकडून बाद झाला. शुभमन गिल दुर्दैवी ठरला. तो केवळ 21 धावांवर धावताना रनआउट झाला. ॲटकिन्सनच्या फॉलो थ्रूमधून आलेल्या अचूक थ्रोमुळे गिलला माघारी जावं लागलं. रवींद्र जडेजा (9) आणि ध्रुव जुरेल (19) यांना देखील ॲटकिन्सनने बाद केलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 6 बाद 204 धावा केल्या.