Lionel Messi Likely To Play Cricket Match : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तब्बल 14 वर्षांनंतर पुन्हा भारतात येत आहे. तो 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत भारतात राहणार असून कोलकाता, दिल्ली आणि मुंबई या तीन शहरांना भेट देणार आहे.
वानखेडेवर विराट, रोहित आणि सचिनसोबत क्रिकेट सामना
एक मोठी बातमी अशी आहे की, मेस्सी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विराट कोहली, रोहित शर्मा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत क्रिकेट सामना खेळणार आहे. हा सामना 7 खेळाडूंमध्ये रंगणार असून, एक विशेष इव्हेंट म्हणून त्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
14 डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियममध्ये हा इव्हेंट होणार असून, क्रिकेटप्रेमींना एका अनोख्या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. 2011 च्या वर्ल्ड कप फायनलसारखा ऐतिहासिक सामना पाहिलेल्या वानखेडेवर आता फुटबॉलच्या बादशहाची बॅटिंग पाहायला मिळणार हे जास्तच थरारक ठरणार आहे.
कोलकातामध्ये होणार सन्मान
कोलकातामध्ये मेस्सीला ईडन गार्डन स्टेडियममध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. कोलकातामध्येच मेस्सी लहान मुलांसाठी फुटबॉल वर्कशॉप आणि ‘फुटबॉल क्लिनिक’ ची सुरूवात करणार आहे. याचबरोबर त्याच्या सन्मानार्थ ‘GOAT Cup’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात येईल.
केरलमध्ये अर्जेंटिना संघाचा सामना
तसेच केरळच्या क्रीडा मंत्र्यांनी यापूर्वीच 6 जूनला जाहीर केले होते की, लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना फुटबॉल संघ ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये केरळमधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुअनंतपुरम येथे फ्रेंडली सामना खेळणार आहे. केरळ सरकार आणि आयोजक यांच्यात यासंदर्भात चर्चा पूर्ण झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
शेवटचा भारत दौरा 2011 मध्ये
मेस्सी याआधी शेवटचं 2011 मध्ये भारतात आला होता. तेव्हा त्याने कोलकाताच्या साल्ट लेक स्टेडियममध्ये वेनेझुएलाविरुद्ध फ्रेंडली सामना खेळला होता. आता तब्बल 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतातील चाहत्यांना त्याची झलक पाहायला मिळणार आहे. भारतातील फुटबॉलप्रेमींसाठी ही नक्कीच सुवर्णसंधी असून, क्रिकेट आणि फुटबॉल या दोन लोकप्रिय खेळांचा ऐतिहासिक सामना पाहण्याची संधी आहे.
हे ही वाचा -