Virat Kohli Replacement : 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड (INDvs ENG) यांच्यातील पाच सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. विराट कोहलीने वैयक्तिक कारणामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. बीसीसीआयकडून (BCCI) याबाबत अधिकृत परिपत्रक काढत माहिती देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची (Virat Kohli Replacement) अद्याप कोणताही माहिती बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेली नाही. सुत्रांच्या वृत्तानुसार, पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयकडून लवकरच विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा होऊ शकते. पण विराट कोहलीच्या जागी कुणाला संधी मिळणार? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. विराट कोहलीच्या जागा घेण्यासाठी बीसीसीआय पाच नावांचा विचार करु शकते. पाहूयात कोणते खेळाडू आहेत......
रजत पाटीदार -
मध्यप्रदेशकडून खेळणाऱ्या रजत पाटीदारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. त्याने आतापर्यंत 55 फर्स्ट क्लास सामन्यात 46 च्या जबरदस्त सरासरीने 4 हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये 12 शतके आणि 22 अर्धशतके आहेत. रजत पाटीदार भारताच्या अ संघाचा सदस्यही आहे. त्याने नुकताच इंग्लंड लॉयन्सविरोधात 151 धावांची खेळी केली. भारतीय संघाने 50 धावांत सहा विकेट गमावल्या तेव्हा रजतने 151 धावांची खेळी केली. विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटसाठी रजतच्या नावाची चर्चा होऊ शकते.
चेतेश्वर पुजारा -
अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा टीम इंडियात कमबॅकसाठी प्रयत्नशील आहे. विराट कोहली बाहेर गेल्यामुळे पुजाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. पुजाराने भारतासाठी अखेरचा सामना जून 2023 मध्ये WTC फायनल खेळली आहे. नुकत्याच झालेल्या रणजी स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली आहे. त्याने सौराष्ट्रासाठी 43, 66, 49, 43 आणि नाबाद 243 धावांची खेळ्या केल्या आहेत.
सर्फराज खान -
26 वर्षीय स्टार फलंदाज सर्फराज खान सध्या जबराट फॉर्मात आहे. त्याने 2020 पासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. मुंबईकडून खेळताना त्याने 44 सामन्यात 68 च्या सरासरीने 3751 धावा चोपल्या आहेत. त्यादरम्यान त्याने 13 शतके आणि 11 अर्धशतके ठोकली आहेत. सर्फराज खान इंडिया अ संघाचाही सध्या आहे. त्याने नुकतीच इंग्लंड लॉयन्सविरोधात 55 आणि 96 धावांची खेळी केली.
अभिमन्यू ईश्वरन -
अभिमन्यू ईश्वरन फर्स्ट क्लासमध्ये खोऱ्याने धावा काढतोय. त्याला सध्या बंगलाची रनमशीन म्हटले जातेय. त्याने 144 डावात 6314 धावा चोपल्या आहेत. त्यामध्ये 21 शतके आणि 26 अर्धशतके ठोकली आहेत. त्याला बांगलादेशविरोधात दोन कसोटी सामन्यासाठी संधी मिळाली होती. तो मध्यक्रममध्ये चांगली फलंदाजी करु शकतो.
रिंकू सिंह -
टी 20 क्रिकेटमध्ये धमाका करणाऱ्या रिंकूने फर्स्ट क्लास सामन्यातही खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. त्याला इंग्लंडविरोधात संधी मिळण्याची शक्यता आहे. 26 वर्षीय रिंकूने 43 फर्स्ट क्लास सामन्यात 58 च्या सरासरीने 3099 धावा चोपल्या आहेत. त्याच्या नावावर सात शतके आणि 20 अर्धशतके आहेत.