RCB New Captain: आयपीएलच्या मागील हंगामात विराट कोहलीनं आरसीबीचं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केले होतं. यामुळं आयपीएलच्या पुढील हंगामात आरसीबीचं नेतृत्व कोण करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. आरसीबीच्या संघानं विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजला कायम ठेवलं आहे. महत्वाचं म्हणजे, विराट कोहलीची जागा घेणं कोणत्याही खेळाडूसाठी सोपं नाही. यामुळं आरसीबीचं कर्णधारपद कोणाकडं सोपवायचं? हे संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान, आरसीबीचे माजी प्रशिक्षक आणि कर्णधार डॅनियल व्हिटोरी यांनी संघाचा पुढील कर्णधार कोण असावा हे सांगितलंय. 


विराट कोहलीनंतर ग्लेन मॅक्सवेल आयसीबीच्या कर्णधारपदासाठी योग्य पर्याय असल्याचं व्हिटोरीनं म्हंटलंय. "मॅक्सवेलनं आरसीबीच्या संघासाठी पहिल्या सत्रात उत्कृष्ठ कामगिरी करून प्रेक्षक आणि संघ व्यवस्थापनाला प्रभावित केलंय. त्यानं 15 सामन्यांमध्ये 513 धावा केल्या आहेत. ज्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. ऑक्शनमध्ये खरेदी केल्या जाणाऱ्या कोणत्याही खेळाडूच्या मागे न जाता मॅक्सवेलला विराट कोहलीचा उत्तराधिकारी म्हणून फ्रँचायझीनं पाठिंबा द्यायला हवा", असं व्हिटोरीनं क्रिकइन्फोशी बोलताना म्हटलंय. 


यापूर्वी मॅक्सवेल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबसारख्या इतर फ्रँचायझींसाठी खेळलाय. त्यानं आरसीबीमध्ये आपला फॉर्म पुन्हा शोधून काढलाय आणि संघाच्या विश्वासावर खरा उतरलाय. त्याची आगामी हंगामासाठी कर्णधारपदी नियुक्ती करून व्यवस्थापन त्या आत्मविश्वासाचं प्रतिफळ देईल, असंही व्हिटोरीनं म्हटलंय. 


हे देखील वाचा- 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha