Chetan Sharma: भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) शुक्रवारी (18 नोव्हेंबर 2022) माजी अध्यक्ष चेतन शर्मासह संपूर्ण निवड समतीच बरखास्त केली. टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमधील भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआयनं नाराजी व्यक्त करत अनेक मुद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यानंतर बीसीसीआयनं शुक्रवारी संपूर्ण निवड समितीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच नव्या निवड समितीसाठी तातडीनं अर्ज देखील मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारिख 28 नोव्हेंबर आहे. 


बीसीसीआयनं चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण निवड समितीने त्यांच्या पदावरून हटवलं. त्यात चेतन शर्मा (उत्तर विभाग), हरविंदर सिंह (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबाशिष मोहंती (पूर्व विभाग) या एकूण चार सदस्यांचा समावेश होता. टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा मोठा पराभव चेतन शर्मासाठी अडचणीचा ठरला. चेतन शर्माच्या कार्यकाळात टीम इंडियाला टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सेमीफायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही पराभव पत्करावा लागला.दरम्यान, चेतन शर्मा यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकुयात. 


वयाच्या 17व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण
पंजाबमधील लुधियाना येथे जन्मलेल्या चेतन शर्मानं वयाच्या 17व्या वर्षीच भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केलं. त्यानं 07 डिसेंबर 1983 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्यांचा जन्म 03 जानेवारी 1966 रोजी झाला. वेगवान गोलंदाज चेतन शर्माने वर्षभरानंतरच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने पाकिस्तानविरुद्ध डेब्यू सामन्यातील पहिल्याच षटकात विकेट घेतली होती.


चेतन शर्माची कारकिर्द
चेतन शर्मानं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 11 वर्षे क्रिकेट खेळलंय. यादरम्यान त्यांनी 23 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 35.45 च्या सरासरीनं 61 विकेट घेतल्या. याशिवाय, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 65 सामने खेळण्याची नोंद आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 34.86 च्या सरासरीनं 67 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे, चेतन शर्मा हा यशपाल शर्माचा पुतण्या आहे, जो 1983 च्या विश्वचषक विजेता संघाचा भाग होता.


हे देखील वाचा-