T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषक आता रंगतदार स्थितीत पोहचला आहे. ग्रुप ब मधून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघाने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलेय. पण अ ग्रुपमधून अद्याप एकाही संघाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळालेले नाही. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा सामना निर्णायक ठरण्याच्या शक्यता आहे. त्याशिवाय बांग्लादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मंगळवारी अ गटातील उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट होणार आहे. क्रिकेट तज्ज्ञानुसार, भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित आहे.


अ ग्रुपमध्ये भारतीय संघ चार गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्याशिवाय टीम इंडियाचा नेट रन-रेट +2.425 इतका आहे.  त्यामुळे उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता जास्त आहे. आशा स्थितीमध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीत कुणाचा सामना करावा लागणार? याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे. 


 उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणाशी होणार ?


विश्वचषकाचं वेळापत्रक पाहिलं तर सुपर 8 मधील ग्रुप अ मधील पहिल्या क्रमांकावरील संघ ग्रुप ब मधील दुसऱ्या क्रमांकासोबत भिडणार आहे. तर ग्रुप ब मधील पहिल्या स्थानावरील संघ ग्रुप अ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघासोबत भिडणार आहे. टीम इंडियाचा सुपर 8 मधील आज अखेरचा सामना आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात भारतीय संघ जिंकला तर टॉपवर राहणार आहे. कमी फरकाने  पराभव झाला तर भारताचा संघ पहिल्या क्रमांकावर राहणार आहे. कारण, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांनी आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवला तरी त्यांच्याकडे चार चार गुण होतील. पण भारताचा रनरेट चांगला असेल, त्यामुळे टॉपवर राहण्याची शक्यता आहे. आशा स्थितीमध्ये भारताचा सामना इंग्लंडसोबत होण्याची शक्यता आहे. ग्रुप ब मध्ये इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे .


पण जर ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला तर भारतीय संघाची गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर घसरण होऊ शकते. ऑस्ट्रेलियाला अव्वल स्थानावर कब्जा मिळवायचा असेल तर भारताला 40 पेक्षा जास्त धावांनी पराभूत करावे लागणार आहे. भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर घसरला तर टीम इंडियाचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण आफ्रिकाविरोधात होणार आहे.


 भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर राहिला तर 27 जूनला होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडसोबत दोन हात करेल.  


इंग्लंड गतविजेता - 


2022 टी20 विश्वचषकावर इंग्लंडने नाव कोरले होते. गतविजेत्या इंग्लंडने शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलेय. उपांत्य फेरीत त्यांचा सामना 27 जून रोजी होणार आहे. सुपर 8 मधील अखेरच्या सामन्यात इंग्लंडने अमेरिकाचा दारुण पराभव केला. जोस बटलरच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने 10 विकेट आणि 62 चेंडू राखून अमेरिकेचा पराभव केला.