Rohit Sharma T20 World Cup 2026 Brand Ambassador : रोहित शर्माची 2026 टी20 विश्वचषकासाठी ब्रँड अॅम्बेसडर म्हणून निवड करण्यात आली आहे. आयसीसी चेअरमन जय शाह यांनी स्वतः ही माहिती देत रोहितची अधिकृत घोषणा केली. पुढील वर्षी 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान हा मेगा टूर्नामेंट होणार असून यात जगभरातील 20 संघ सहभागी होतील. ब्रँड अॅम्बेसडर म्हणून रोहित शर्मा विविध शहरांमध्ये आणि मैदानांमध्ये जाऊन विश्वचषकाचे प्रमोशन करतील.
रोहित शर्माला या भूमिकेसाठी किती मानधन मिळेल?
टी20 विश्वचषकासाठी नियुक्त केलेल्या ब्रँड अॅम्बेसडरला दिले जाणारे वेतन किंवा मानधन साधारणतः सार्वजनिक केले जात नाही. आयसीसी आणि संबंधित खेळाडू यांच्यात होणारा करार गोपनीय असतो आणि त्यातील आर्थिक बाबी बाहेर सांगितल्या जात नाहीत. एखाद्या खेळाडूची ब्रँड व्हॅल्यू, मार्केट रेट आणि त्याच्या एंडोर्समेंट फीसच्या आधारे ही रक्कम निश्चित केली जाते.
रोहित शर्माच्या बाबतीत बोलायचे झाले तर, विविध मीडिया रिपोर्टनुसार तो एका एंडोर्समेंटसाठी अंदाजे 3.5 ते 7 कोटी रुपये घेतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की विश्वचषकाच्या ब्रँड अॅम्बेसडर म्हणून त्याला तितकीच रक्कम दिली जाईल. या आकड्यांचा आधार घेऊन त्याला किती मानधन दिले जाईल हे ठरवले जाऊ शकते.
2024 टी20 विश्वचषकासाठी युवराज सिंग, शाहिद आफ्रिदी, ख्रिस गेल आणि धावपटू उसैन बोल्ट यांची ब्रँड अॅम्बेसडर म्हणून निवड झाली होती. त्यांना किती मानधन मिळाले किंवा मिळाले नाही, याबद्दल आयसीसीने कोणतीही माहिती जाहीर केली नव्हती.
निवृत्तीनंतरचा नवा टप्पा
रोहित शर्माने एका वर्षाच्या आत टी20 आणि कसोटी फॉर्मेटला अलविदा केले. हा निर्णय कोणत्याही क्रिकेटरसाठी सोपा नसतो, पण यामुळे त्याला कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळत आहे. रोहित शर्माची ब्रँड अॅम्बेसडर घोषित केले, तेव्हा तो म्हणाला, "आतापर्यंत खेळाडू म्हणून प्रत्येक टी20 वर्ल्ड कपचा भाग होतो, पण आता फक्त टीव्हीसमोर बसून पाहणं… हा वेगळाच अनुभव आहे. मला घरात राहून सामना पाहण्याची सवय होत चालली आहे."
टी20तील ‘हिटमॅन’
भारतासाठी सर्वात यशस्वी टी20 फलंदाज म्हणून रोहित शर्माचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 159 टी20 सामन्यांत 4231 धावा केल्या. या यादीत विराट कोहली 4188 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
'भारत पुन्हा जिंकावा...' रोहित शर्मा
रोहित शर्माने आशा व्यक्त केली की सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा टी20 वर्ल्ड कप जिंकेल. तो म्हणाला, "मला विश्वास आहे की टीम यंदाही मागच्या वर्षासारखेच चमत्कारिक प्रदर्शन करेल, काही नवीन चेहऱ्यांसह. आयसीसी ट्रॉफी जिंकणे सोपे नाही. माझ्या 18 वर्षांच्या करिअरमध्ये मला अलीकडे दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं भाग्य लाभलं."
हे ही वाचा -