WI vs SCO, Match Report : वर्ल्ड कप क्वॉलिफायर सामन्यात मोठा उलटफेर झाला आहे. स्कॉटलँड संघाने शनिवारी वेस्ट इंडीजला सात विकेटने मात दिली. दोन वेळा विश्वचषक उंचावणाऱ्या वेस्ट इंडिजवर मोठी नामुष्की ओढावली आहे. 1975 पासून पहिल्यांदाच वेस्ट इंडिज विश्वचषकात खेळणार नाही. आतापर्यंत झालेल्या टी 20 आणि वनडे विश्वचषकात वेस्ट इंडिज संघाचा सहभाग होता. पण यंदा वेस्ट इंडिजच्या संघाशिवाय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. नाणेफेक गमावल्यानंतर वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 43.5 षटकात 181 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल स्कॉटलँडने सात विकेट राखून विजय मिळवलाय.
दोन वेळच्या विश्वविजेत्याला स्कॉटलँडने हरवले -
वेस्ट इंडिजने दिलेले 182 धावांचा आव्हान स्कॉटलँडने 4.3 षटकात तीन विकेटच्या मोबद्लयात पार केले. स्कॉटलँडकडून मॅथ्यू क्रॉस याने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. 107 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने क्रॉस याने 74 धावांची खेळी केली. क्रॉसशिवाय ब्रँडन मॅक्युलन याने 106 चेंडूत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 69 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर, रोमरियो शेफर्ड आणि अकील हुसेन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
जेसन होल्डरच्या सर्वाधिक धावा -
स्कॉटलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजला 200 धावांचा पल्लाही पार करता आला नाही. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर याने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. होल्डरने 79 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने 45 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजच्या पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. स्कॉटलँडकडून ब्रँडन मॅक्युलन याने अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले. गोलंदाजी करताना त्याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर फलंदाजीत अर्धशतक झळकावले. त्याशिवाय ख्रिस सोल, मार्क वॉट आणि ख्रिस ग्रीव्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर साफयान शरीफ याने एक विकेट घेतली.
पहिल्यांदा वेस्ट इंडिजशिवाय विश्वचषक -
सुपर सिक्स फेरीच्या सामन्यात स्कॉटलँड संघाने वेस्ट इंडिजला 7 गडी राखून पराभूत केले. यासह वेस्ट इंडीज 2023 वनडे विश्वचषकासाठी पात्र होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 या दोन एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले आहे. एकेकाळी क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणारा वेस्ट इंडिज संघ यंदा विश्वचषकात खेळताना दिसणार नाही. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ खेळताना दिसणार नाही. पाच ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान भारतात विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.