मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर लवकरच बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) खेळ विकास शाखेत (BCB's game-development wing) सहभागी होऊ शकतो. यादरम्यान, तो अंडर-19 खेळाडूंसोबत तसंच बांगलादेशातील हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये काम करताना दिसू शकतो. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा भाग बनल्यानंतर तो युवा खेळाडूंच्या खेळात सुधारणा करण्यावर तसंच बोर्डाच्या उच्च कामगिरीवर भर देण्याचं काम करेल.


बांगलादेश संघासोबत याआधीही काम
याआधी 2019 मध्ये, वसीम जाफरने मिरपूरमधील BCB अकादमीचा फलंदाजी सल्लागार म्हणून काही महिन्यांसाठी काम केलं होतं. तिथे त्याने अंडर-16 आणि अंडर-19 च्या युवा खेळाडूंसोबत काम केलं होतं. तसंच हाय परफॉर्मन्स सेंटर कमिटीशीही तो संबंधित होता. जाफर 2018-19 मध्ये अबाहानी लिमिटेडकडून ढाका प्रीमियर लीगमध्येही खेळला होता, असं Cricinfo च्या वृत्तात म्हटलं आहे.


किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाजी सल्लागाराची जबाबदारी 
44 वर्षीय वसीम जाफर काही काळापूर्वी ओदिशाच्या सीनियर पुरुष संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. ओदिशा क्रिकेट असोसिएशनने दोन वर्षांचा करार केला होता. आपल्या कार्यकाळात तो प्रशिक्षकांच्या विकास कार्यक्रमाचाही भाग होता. मार्च 2020 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जाफरची उत्तराखंड क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही निवड झाली होती. मात्र मतभेद झाल्याने त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. जाफरने 2019 ते 2021 पर्यंत आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहिलं होतं.


व्रिक्रमवीर वसीम जाफर
जवळपास दोन दशके क्रिकेट खेळणाऱ्या जाफरच्या नावावर रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 156 सामने खेळण्याचा विक्रम आहे. याशिवाय सर्वाधिक धावा (12,038), सर्वाधिक शतके (40), सर्वाधिक झेल (200), तसंच दुलीप ट्रॉफी (2545) आणि इराणी ट्रॉफी/कप (1294) मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेही विक्रम त्याच्या नावावर जमा आहेत. 2008-09 आणि 2018-19 मध्ये दोनदा रणजी हंगामात 1000 धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.


वसीम जाफरने भारतासाठी 31 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 34.10 च्या सरासरीने 1944 धावा केल्या आहेत. यात पाच शतकांचा समावेश आहे. याशिवाय वसीम जाफर दोन वनडे सामने खेळला आहे. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यानंतर जाफर हा भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू आहे.