Virat Kohli Twitter Followers: आशिया चषकात आपल्या जुन्या अंदाजात फलंदाजी करत पुन्हा फॉर्ममध्ये पतरणाऱ्या भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, ट्विटरवर 50 दशलक्ष फॉलोवर्सचा टप्पा गाठणारा विराट कोहली पहिला क्रिकेटपटू ठरलाय. विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोशल मीडिया याचा ताजा पुरावा आहे.
जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या विराटनं त्याची जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणना का केली जाते? हे आशिया चषकात दाखवून दिलं. कोहलीनं या स्पर्धेदरम्यान नोव्हेंबर 2019 पासूनचा शतकाचा दुष्काळही संपवलाय. अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात त्यानं 61 चेंडूत नाबाद 122 धावांची खेळी केली. क्रिकेटच्या मैदानावर अफाट कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीचा सोशल मीडियावरही दबदबा पाहायला मिळतोय. ट्विटरवर 50 दशलक्ष फॉलोवर्स असलेला तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरलाय. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनच्या ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या 37.8 दशलक्ष इतकी आहे.
विराट कोहलीच्या फॉलोवर्सच्या संख्येत वाढ
जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 211 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर, फेसबूकवर त्याचे 49 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर, ट्विटरच्या फॉलोवर्सची संख्या 50 मिलियन झालीय. ज्यामुळं विराटचे सोशल मीडियावर 310 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
विराट कोहलीनं भारतासाठी आतापर्यंत 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 104 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 8 हजार 74 धावांची नोंद आहे. ज्यात 27 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 12 हजार 344 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 43 शतक आणि 64 अर्धशतक झळकावली आहेत. याशिवाय, त्यानं टी-20 क्रिकेटमध्ये एक शतक आणि 32 अर्धशतकांच्या मदतीनं 3 हजार 584 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये प्लेअर ऑफ द मॅच जिंकण्याचा विक्रम
भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 'प्लेअर ऑफ द मॅच' जिंकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. त्यानं आतापर्यंत 13 वेळा हा पुरस्कार जिंकलाय. विराटनंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मानं 11 वेळा 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार जिंकलाय.
हे देखील वाचा-