ICC T20 World Cup 2022: ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 साठी  काल 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. आगामी टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करतान दिसणार आहे. तर, केएल राहुलकडं (KL Rahul) संघांच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. याशिवाय अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र, याचदरम्यान कधीकाळी भारतीय क्रिकेट संघाचा भाग राहिलेला वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेनं (Ishwar Pandey) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. टी20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर पांडेनं इंस्टाग्रामद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केलीय. 


ईश्वर पांडेला भारतीय संघाकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला नाही. दरम्यान, 2014 मध्ये भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु, या दौऱ्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघाकडून खेळण्याच्या प्रतिक्षेत असेलेल्या पांडेनं काल अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेताला. पांडेनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. 


ईश्वर पांडेनं इंस्टाग्राम पोस्ट- 






 


ईश्वरचंद पांडेनं इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलंय?
इंस्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा करताना ईश्वरचंद पांडेनं लिहिलंय की, “अखेर आज तो दिवस आला, मनावर दगड ठेवून मी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय 2007 मध्ये मी हा अद्भुत प्रवास सुरू केला आणि तेव्हापासून मी मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रत्येक क्षणाचा आनंद घेतलाय. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सामील होणे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. पण देशासाठी अधिक खेळण्याची संधी मिळू शकली नाही याचंही दु:ख आहे."


ईश्वरचंद पांडेची कारकिर्द
ईश्वरचंद पांडेनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 75 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये मध्य प्रदेशच्या संघाचं प्रतिनिधित्त्व केलंय. या 75 सामन्यांमध्ये त्याने 263 विकेट्स घेतल्या आहेत.तसेच भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलमध्ये आपला सहभाग नोंदवलाय. आयपीएलमध्ये त्यानं 25 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं चेन्नईव्यतिरिक्त पुणे वॉरियर्स आणि रायझिंग सुपर जायंट्स संघाचंही प्रतिनिधित्व केलंय.


टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, दिपक हुडा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह आणि आर अश्विन. स्टॅंडबाय- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई आणि दिपक चहर.


हे देखील वाचा-