Virat Kohli Records : भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज खेळी केली. या सामन्यात त्याने 110 चेंडूत 166* धावा केल्या. त्याच्या खेळीत एकूण 13 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 150.91 होता. कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शतकं झळकावली. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले होते. त्यानंतर आता तिरुअनंतपुरममध्ये शतक झळकावून सचिन तेंडुलकर आणि महेला जयवर्धने यांसारख्या दिग्गजांचे काही विक्रम त्याने मोडीत काढले. तर आजच्या शतकासह कोहलीने नावावर केलेले काही दमदार रेकॉर्ड पाहू...



  1. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील 46 वं शतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा कोहली हा दुसरा फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर 49 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

  2. ओपनिंग व्यतिरिक्त इतर क्रमांकावर फलंदाजी करत, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 वेळा 150 धावांचा टप्पा पार करणारा विराट पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यामध्ये रोहित शर्मा हा ओपनर म्हणून 8 वेळा अशी कामगिरी करणारा नंबर वन भारतीय फलंदाज आहे.

  3. 15 जानेवारीला किंग कोहलीच्या बॅटमधून चौथे शतक झळकले. यापूर्वी 15 जानेवारी 2017 रोजी त्याने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 122 धावा, 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत 153 धावा आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 104 धावा केल्या होत्या. आता 2023 मध्ये पुन्हा एकदा 15 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध त्याने 166 धावांची नाबाद खेळी खेळली.

  4. विराट कोहलीने घरच्या भूमीवर खेळताना सर्वाधिक 22 शतकं झळकावली आहेत. गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 21 वे घरच्या मैदानवरील शतक झळकावले. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत भारतात एकूण 20 शतकं झळकावली होती.

  5. श्रीलंकेविरुद्ध खेळताना विराट कोहलीने सर्वाधिक 10 शतकं झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 9 शतकं झळकावली होती.

  6. या शतकासह विराटने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे. कोहलीने वनडेमध्ये 12754 धावा केल्या आहेत. तर महेला जयवर्धनेने एकदिवसीय कारकिर्दीत एकूण 12650 धावा केल्या.

  7. सध्याच्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके आहेत. कोहलीने एकूण 74 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. यामध्ये डेव्हिड वॉर्नर 45 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  8. आज श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने कारकिर्दीतील 74 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. तो याबाबतीत केवळ सचिनच्या मागे आहे. सचिननं 100 शतकं झळकावली आहे.

  9. श्रीलंकेविरुद्धच्या या शतकात विराटने वनडेच्या एका डावात सर्वाधिक षटकार ठोकले. या खेळीत त्याच्या बॅटमधून एकूण 8 षटकार निघाले.

  10. विराटने एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरी उच्च धावसंख्या केली. या सामन्यात त्याने 166 धावांची नाबाद खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 183 धावा आहे.


हे देखील वाचा-