Ind vs Aus 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन येथे सुरू असलेली कसोटी आता अनिर्णितेच्या दिशेने वाटचाल करत आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत टीम इंडिया या सामन्यात पिछाडीवर होती, मात्र चौथ्या दिवशी केएल राहुल आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने सामन्यात पुनरागमन केले. जडेजा बाद झाल्यानंतर टीम इंडियाला फॉलोऑन वाचवता येणार नाही असे वाटत होते, मात्र 9 विकेट पडल्यानंतर आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह यांनी आक्रमक वृत्ती स्वीकारत फॉलोऑन वाचवला. भारताने 246 धावा करताच ड्रेसिंग रूममध्ये आनंदाचे वातावरण होते.  






जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप सिंग यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळाच्या शेवटच्या सत्रात टीम इंडियासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी शेवटच्या सत्रात दमदार फलंदाजी करत टीम इंडियाचा फॉलोऑन वाचवला. फॉलोऑन वाचल्यानंतर कॅमेरा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमकडे गेला. आतापर्यंत तणावात दिसणारे चेहरे अचानक आनंदी दिसू लागले. विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एकमेकांना मिठी मारली आणि सुटकेचा नि:श्वास सोडला. ज्याची प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






भारताने फॉलोऑन कसा वाचवला?


जोपर्यंत रवींद्र जडेजा खेळत होता तोपर्यंत भारतीय चाहत्यांना आशा होती की, टीम इंडिया 246 धावा करून फॉलोऑन तरी वाचवेल, पण पॅट कमिन्सच्या चेंडूवर तो 77 च्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. जडेजा बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 213 होती. फॉलोऑन वाचवण्यासाठी 33 धावांची गरज होती. टीम इंडियाची मैदानावरील शेवटची जोडी म्हणजे जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप. दोघांनीही जबाबदारी स्वीकारली आणि चांगली कामगिरी करत कांगारूंना थक्क केले. बुमराहने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला जोरदार षटकार ठोकला आणि काही वेळाने आकाश दीपने चौकार मारून भारताची लाज वाचवली.






ब्रिस्बेन कसोटी अनिर्णितेच्या दिशेने


ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ अजूनही वरचढ आहे, मात्र पावसामुळे खेळ आता अनिर्णितकडे वाटचाल करत आहे. टीम इंडियाला फॉलोऑन वाचवता आला नसता तर टीम इंडियासाठी खेळ अवघड झाला असता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने आतापर्यंत 9 विकेट गमावून 252 धावा केल्या आहेत.


हे ही वाचा -


India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!