कोलकाता : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांच्या मनावर विराट कोहली (Virat Kohli) सध्या राज्य करत आहे. मात्र, विराट कोहलीच्या मनात सचिन तेंडुलकरबद्दल (Sachin Tendulkar) प्रचंड आदर आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटने 49 वे शतक झळकावत सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. सामना संपल्यानंतर सचिन तेंडुलकरसोबत बरोबरी करू शकत नसल्याचे विराटने प्रांजळपणे सांगितले. विराटच्या या प्रतिक्रियेचे सध्या कौतुक होत आहे. 


कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 49 व्या शतकाच्या जोरावर  टीम इंडियाने पाच विकेट्सवर 326 धावा उभारल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 27.1 षटकात 83 धावांवर गुंडाळत मोठा विजय नोंदवला.


विराटने काय म्हटले?


विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी बोलताना विराटने म्हटले की, 'माझ्या हिरोच्या विक्रमाची बरोबरी करणे हा खूप मोठा सन्मान आहे. फलंदाजीच्या बाबतीत तो 'परफेक्ट' ठरला आहे. तो एक भावनिक क्षण आहे. मी कुठून आलो ते दिवस मला माहित आहेत, मला ते दिवस माहित आहेत जेव्हा मी त्यांना टीव्हीवर पाहिले होते. त्यांच्याकडून कौतुक मिळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, असे विराटने म्हटले. 






'मास्टर'कडूनही किंगचे कौतुक


कोहलीच्या शतकानंतर तेंडुलकरने ट्वीटरवर विराटचे 49 व्या शतकाबद्दल अभिनंदन केले. सचिनने म्हटले की, 'विराटने शानदार खेळी खेळली. या वर्षाच्या सुरुवातीला मला 49 ते 50 (वर्षांचं) होण्यासाठी 365 दिवस लागले. मला आशा आहे की पुढील काही दिवसांत तू 49 ते 50 (शतके) गाठाल आणि माझा विक्रम मोडाल. अभिनंदन.' 


 






याबाबत कोहलीला विचारले असता तो म्हणाला, 'तेंडुलकरचा संदेश खूप खास आहे. हे सर्व सध्या खूप आहे.कोहली म्हणाला की, चाहत्यांनी हा सामना त्याच्यासाठी खूप खास बनवला. तो म्हणाला, ‘हा एक आव्हानात्मक सामना होता. कदाचित, स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वात कठीण संघाविरुद्ध खेळताना आम्हाला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली, असेही कोहलीने म्हटले. 


विराटने पुढे म्हटले की,  जेव्हा तुमच्या संघाचे सलामीवीर फलंदाज झटपट धावा करतात, तेव्हा खेळपट्टी चांगली आहे असं तुम्हाला वाटतं. चेंडू जुना झाल्यानंतर मात्र परिस्थिती बदलते. टीम मॅनेजमेंटकडून मला अखेरपर्यंत खेळपट्टीवर राहण्याचा निरोप आला होता. आम्ही 315 धावा केल्या तेव्हा आम्ही चांगली धावसंख्या उभारली याचे समाधान होते.