IND Vs SA, Match Highlights : भारताने विश्वचषकात सलग आठव्या विजयाची नोंद केली. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी विराट पराभव केला. रवींद्र जाडेजाने अष्टपैलू कामगिरी केली. फलंदाजी करताना त्याने जबराट फिनिशिंग केले, त्यानंतर गोलंदाजीत त्याने पाच विकेट्स घेतल्या. विराट कोहलीने 49 वे वनडे शतक ठोकले. त्याशिवाय श्रेयस अय्यरने अर्धशतकही ठोकले. विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.


भारताने दिलेल्या 327 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब झाली. भन्नाट फॉर्मात असेलला क्विंटन डिकॉक अवघ्या पाच धावांवर तंबूत परतला. मोहम्मद सिराजने त्याला त्रिफाळाचीत बाद केले. त्यानंतर आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. 40 धावांवर आफ्रिकेचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. जाडेजा आणि शामी यांच्या माऱ्यापुढे आफ्रिकेने गुडघे टेकेले. टेम्बा बवुमा याने 11 धावा जोडल्या. रासी डुसेन याने 13 धावा केल्या. त्याशिवाय मार्के यान्सन याने 14 धावांची खेळी केली. 


दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला 15 धावसंख्याही ओलांडता आली नाही. मार्को यान्सन याने सर्वाधिक 14 धावांची खेळी केली. क्विंटन डिकॉक, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, कगिसो रबाडा आणि एनगिडी यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. टेम्बा बवुमा 11, डुसेन 14 आणि मार्को यान्सन 14 यांनाच फक्त दुहेरी धावसंख्या ओलांडता आली. स्पर्धेत तुफान फॉर्मात असणारी आफ्रिकेची फलंदाजी भारताच्या माऱ्यापुढे सपशेल अपयशी ठरली. 


भारताकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 9 षटकात 33 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. जाडेजाने कगिसो रबाडा, केशव महाराज, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन आणि टेम्बा बवुमा यांना तंबूचा रस्ता दाखवला. मोहम्मद शामी याने दोन फलंदाजांना माघारी झाडले. शामीने 4 षटकात 18 धावा खर्च केल्या. कुलदीप यादवने 5.1 षटकात सात धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेतल्या. सिराजने 4 षटकात 11 धावा दिल्या. बुमराहने 5 षटकात फक्त 14 धावा दिल्या. 


विराटचे शतक, भारताचे 326 धावांचा डोंगर - 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला फलंदाजीचा किंग विराट कोहलीनं आपल्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात विराटनं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं आपलं ४९वं शतक साजरं केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक ४९ शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटनं १२१ चेंडूंमधली नाबाद १०१ धावांची ही खेळी दहा चौकारांनी सजवली. त्याच्या या खेळीनंच भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३२७ धावांचं लक्ष्य उभं करण्याची संधी दिली. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं अवघ्या सहा षटकांमध्येच ६२ धावांची सलामी दिली होती. त्यानंतर विराट कोहलीनं श्रेयस अय्यरच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी रचली आणि भारतीय डावाला आणखी मजबुती दिली. श्रेयस अय्यरनं ८७ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह ७७ धावांची खेळी उभारली.