कोलकाता : खेळ कोणताही असो ज्यावेळी जिंकत असतो त्यावेळी उणीवांवर किंवा झालेल्या चुकांवरती कोणी सहसा लक्ष ठेवत नसतं. ते विजयामागे लपून जात असतं. असंच काहीसं वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचं सुद्धा झालं आहे. दक्षिण आफ्रिकेने गेल्या काही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करताना सरासरी साडेतीनशे ते चारशे धावांचा डोंगर उभा केला होता. त्यांच्या टॉप फाईव्ह फलंदाजांकडून दमदार फलंदाजी सुरू आहे. मात्र, या सर्वांना जेव्हा चेस करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र हे सर्व तोकडे आहेत याचाच नमुना आज कोलकात्यामधील ईडन गार्डन मैदानावरती दिसून आला. 


पहिल्यांदा बॅटिंग करून विजय आणि आव्हानाचा पाठलाग करून विजय फरक


टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 326 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजीची पूर्ती भंबेरी उडाली. ज्या ठिकाणी विराटने संघर्ष करून दमदार शतकी खेळी केली त्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकाचा संघ त्याच्या एवढ्याही धावा करू शकला नाही. त्यांचा संपूर्ण डाव 83 धावांमध्ये कोलमडला. यावरून पहिल्यांदा बॅटिंग करून विजय मिळवण्यात आणि आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळण्यामध्ये किती फरक आहे आणि टीम इंडियाची गोलंदाजी किती धारदार आहे याचीच प्रचिती आज ईडन गार्डन मैदानावर आली. 






गेल्या काही सामन्यांपासून आफ्रिकेच्या फलंदाजीची त्याचबरोबर शेवटच्या 10 षटकातील त्यांचा काउंटर अटॅक याबद्दल सातत्याने बोलले जात होतं. त्यामुळे टीम इंडियासमोर एक मोठं आव्हान निर्माण करणार का? अशी चर्चा सुरू होती. मात्र या सर्व चर्चेला उत्तर देत इतर संघांना सुद्धा संदेश देण्याचा प्रयत्न टीम इंडियाच्या कामगिरीतून झाला आहे. 


सुरुवातीला रोहितने नाणेफेक जिंकली. त्यानंतर त्याने नेहमीच्या शैलीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर कडाडून प्रहार केला. पहिल्या सहा षटकांमध्येच टीम इंडियाच्या 60 धावा फलकांवरती लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. त्यानंतर खेळपट्टी स्लो झाली. रोहित आणि गिल बाद झाल्यानंतर टीम मॅनेजमेंटचा संदेश शिरसावंद्य मानत विराट कोहलीने खेळपट्टीवर ठाण मांडून संघाचा धावफलक हलता ठेवला. श्रेयसने त्याला उत्तम साथ दिली आणि टीम इंडियाने त्रिशतकी मजल मारली. शेवटच्या षटकांमधील सुर्या आणि जडेजाची फटकेबाजी निर्णाय ठरली. 


दक्षिण आफ्रिकेला आपली रणनीती बदलावी लागणार


मात्र, फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची स्थिती मात्र उलटीच राहिली. ज्या पद्धतीने गेल्या सात सामन्यांमध्ये टीम इंडियाची गोलंदाजी आहे अगदी त्याच पद्धतीने या सामन्यांमध्ये पण दिसून आली. डिकाॅक बाद झाल्यानंतर हा संघ दडपणाखाली येतो हे आज पुन्हा एकदा दिसून आले. आफ्रिकेचा कॅप्टन सुद्धा टीम इंडियासमोर चालला नाही. त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग कोसळली आणि बघता बघता 83 धावांवरती ऑल आऊट झाला.


या संघाला वर्ल्डकप विजेता होणार म्हणून प्रबळ दावेदार मानलं जात आहे. तोच संघ आज टीम इंडियाच्या अष्टपैलू कामगिरी समोर पूर्णतः उघडा पडला. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला आता आपली रणनीती बदलावी लागणार आहे. त्यांच्यावर आजवरचा जो चोकर्सचा शिक्का बदल बसला आहे तो आजवर बदलता आलेला नाही. आज दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी पाहून त्यांच्यासाठी निश्चितच चिंताजनक स्थिती आहे. 


पुढील सामन्यांसाठी तसेच सेमीफायनलसाठी रणनीती ठरवताना त्यांना या आजच्या सामन्यातून ज्या काही चुका झाल्या किंवा ज्या काही उणीवा जाणवल्या त्यावर मात करावी लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर बसलेला चोकर्सचा शिक्का हा कधीही पुसला जाणार नाही हे पुन्हा एकदा आज टीम इंडियाविरुद्ध त्यांच्या कोसळलेल्या फलंदाजीवरून सिद्ध झालं आहे. 


ज्या ठिकाणी आफ्रिकेचा महाराज चालला त्या ठिकाणी जडेजानं सुद्धा पाच विकेट घेत आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. कुलदीपने सुद्धा दोन विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली. तर शमीने दोन ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या. सिराजला एक विकेट मिळाली. बुमराहला विकेट मिळाली नसेल. मात्र, त्याचा तो नियंत्रित मारा असतो तो नेहमीच विरोधी संघावरती दडपण आणत असतो. दुसरीकडे टीम इंडियाला सुरुवात करून देण्यात रोहित शर्मा नेहमीप्रमाणे यशस्वी ठरला.


इतर महत्वाच्या बातम्या