Virat kohli Captaincy : निवड समितीने बुधवारी भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड केली. त्यासह विराट कोहलीच्या चार वर्षाच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीचा शेवट झाला. चार वर्षांपूर्वी 2017 मध्ये धोनीकडून विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. तेव्हापासून विराट कोहलीनं आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला यशस्वीपणे पुढे नेहलं. चार वर्षांत विराट कोहलीनं अनेक विक्रम प्रस्थापित केले, शिवाय संघाला अश्यक्यप्राय विजयही मिळवून दिले. पाहूयात कर्णधार म्हणून चार वर्षातील विराट कोहलीची कामगिरी... 


विराट कोहलीने 95 सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यादरम्यान भारतीय संघाचा 65 सामन्यात विजय झालाय तर 27 सामन्यात पराभवाचा सामना करावा लगाला. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय एकदिवसीय संघाची विजयाची टक्केवारी 70 टक्के इतकी आहे. कर्णधार असताना विराट कोहलीने 72 च्या सरासरीने  पाच हजार 449 धावांचा पाऊस पाडलाय. 


एकदिवसीय सामन्यात विजयाच्या टक्केवारीमध्ये विराट कोहली जगात चौथ्या क्रमांकावर आहे. वेस्टविंडिजचे माजी कर्णधार क्लाइव लॉयड 77.71 टक्के सामने जिंकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रिकी पॉन्टिंगची टक्केवारी 76.14 टक्के इतकी आहे. तर हॅन्सी क्रोनिये 73.70 टक्के सामने जिंकत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीची विजयाची टक्केवारी धोनीपेक्षा जास्त आहे. 


विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 19 पैकी 15 मालिका जिंकल्या आहेत. तर चार मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानावर विराट कोहलीनं 9 पैकी 8 मालिका जिंकल्या आहेत.  कर्णधार म्हणून विराट कोहलीने विदेशातही भारतीय संघाला विजय मिळवून दिलेत. ऑस्ट्रेलियात 2-1, दक्षिण आफ्रिकामध्ये 5-1, वेस्ट विंडिजमध्ये 3-1 ने मालिका जिंकल्या आहेत. त्याशइवाय न्यूझीलंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वेमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने विजय मिळवलाय.  


कर्णधार असताना विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडलाय. 95 सामन्यात विराट कोहलीने 72 च्या सरासरीने पाच हजार 449 धावांचा पाऊस पाडला. यादरम्यान विराटने 21 शतकं आणि 27 अर्धशतकं झळकावली आहेत. कर्णधार असताना सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या कर्णधारांमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. 22 शतकांसह ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग पहिल्या क्रमांकावर आहे.  


विराट कोहलीला कर्णधार असतानाही एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 2019 च्या विश्वचषकात उपांत्य सामन्यात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं होतं. तर चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघानं भारताचा पराभव केला होता.