Virat Kohli ODI Ranking Team India : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) दिग्गज खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) याच्याकडे सर्वकालिन महान खेळाडू म्हणून पाहिलं जातं. त्याने अनेक प्रसंगी दमदार कामगिरी करत संघासाठी मॅचविनिंग खेळी केली आहे. कोहलीच्या नावावर आतापर्यंत अनेक विश्वविक्रम आहेत. या यादीत आणखी एक विशेष विक्रम आहे जो मागील 12 वर्षांपासून मोडलेला नाही आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत देखील अबाधित राहिला आहे. कोहली गेली सलग 12 वर्षे भारतीय फलंदाजांच्या यादीत वर्षअखेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे आणि यावेळीही हा विक्रम कायम ठेवण्यात त्याला यश आलं आहे.


कोहलीने ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेमध्ये पदार्पणाचा सामना खेळला होता. यानंतर त्याने आतापर्यंत 265 वनडे खेळताना 12 हजार 471 धावा केल्या आहेत. 2011 पासून वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय क्रमवारीत कोहली अव्वल भारतीय फलंदाज आहे. सलग 12 वर्षे अशी कामगिरी करणारा तो भारतीय फलंदाजांच्या यादीत एकमेव खेळाडू आहे. कोहली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत ओव्हरऑल 8 व्या स्थानावर आहे. या यादीत रोहित शर्मा त्याच्या खालोखाल 9 व्या स्थानावर आहे.


कोहलीची एकदिवसीय कारकिर्द


कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 256 डावांमध्ये 44 शतकं आणि 64 अर्धशतकं केली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 धावा इतकी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 1 हजार 172 चौकार मारले आहेत आणि यासह 128 षटकारही ठोकले आहेत. त्याने 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4008 धावा केल्या आहेत. कोहलीने या फॉरमॅटमध्ये 37 अर्धशतकं आणि एक शतक झळकावलं आहे.


वर्षअखेरीस एकदिवसीय क्रमवारीत अव्वल भारतीय फलंदाज



  • 2015 - कोहली

  • 2016 - कोहली

  • 2017 - कोहली

  • 2018 - कोहली

  • 2019 - कोहली

  • 2020 - कोहली

  • 2021 - कोहली

  • 2022 - कोहली


विराटनं आंतरराष्ट्रीय टी20 मधून घेतलाय ब्रेक


भारतीय संघ आणि श्रीलंका संघ यांच्यात टी-20 मालिकेला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वी विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्पुरती विश्रांती घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विराट आयपीएल 2023 पूर्वी भारतासाठी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट अर्थात टी20 मध्ये खेळताना दिसणार नाही. विराट कोहलीच्या ब्रेकबद्दल माहिती देताना, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सला सांगितले की, “होय, विराटने कळवले आहे की तो टी20 सामन्यांसाठी उपलब्ध नाही. वनडे मालिकेतून तो संघात पुनरागमन करेल.''


हे देखील वाचा-