Haris Rauf's Sad Story : भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाची सुरुवात होण्यापूर्वीच पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ चर्चेत आहे. हॅरिस रौफ याने आपल्या संघर्षाची गाथा सर्वांसमोर मांडली आहे. परिस्थिती हालाकीची होती. त्यामुळे शाळेची फी भरण्यासाठी घरच्यांकडे पैसे नव्हते. त्यामुळे शाळेची फी भरण्यासाठी स्नॅक्स विकत होतो, असे हॅरीस रौफ याने सांगितले. हॅरिस रौफ पाकिस्तानचा सध्या आघाडीचा गोलंदाज आहे. शाहीन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांच्यावर पाकिस्तानचा वेगवान मारा अवलंबून आहे. यंदाच्या विश्वचषकात हॅरिस रौफच्या कामगिरीकडे क्रीडा जगताचे लक्ष असेलच, पाकिस्तानच्या चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.
2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या संघात हॅरिस रौफ याने पदार्पण केले होते. हॅरिस रौफ विश्वचषकासाठी भारतात आलाय. हॅरिस रौफ याने ‘ईएसपीएन क्रिकइंफो’ ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने आपल्या सुरुवातीच्या दिवसातील संघर्ष सांगितला. तो म्हणाला की, शाळेत फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे स्नैक्स विकत होते. त्याशिवाय टेप बॉल क्रिकेटचीही मदत घेतली. दहावीनंतर फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे रविवारच्या बाजारात स्नैक् विकत होते. त्यानंतर इतर सहा दिवस शाळेमध्ये शिकत होतो.
रौफ म्हणाला की, रौफ याने पदवीचे शिक्षणासाठी प्रवेश तर घेतला होता. पण फी भरण्यासाठी वडिलांकडे पैसे नव्हते.. ते खर्च उचलू शकत नव्हते. पण मी हार मानली नाही. मी टेप बॉल क्रिकेटमधून पैसे कमवले अन् फी मॅनेज केली. पाकिस्तानमध्ये व्यावसायिक टेप बॉल खेळणारे खेळाडू महिन्याला दोन ते अडीच लाख रुपयांची कमाई करतात. मी पण महिन्याला दोन ते अडीच लाख रुपयांची कमाई करत होतो. माझा खर्च भागल्यानंतर घरी आईकडे पैसे देत होते. वडिलांना कधीही याबाबत सांगितले नव्हते.
घराच्या किचनमध्ये झोपावे लागत होते -
घरची परिस्तिती हलाकीची होती. कधीकधी घराच्या किचनमध्ये झोपावे लागत होते. हॅरिस रौफ म्हणाला की, माझ्या वडिलांना तीन भाऊ होते, सर्वजण सोबतच राहत होते. वडील त्यांच्या खोलीमध्ये झोपत होते. पण काकांचे लग्न झाल्यानंतर वडिलांनी आपली खोली काकांना दिली. त्यामुळे आम्हाला किचनमध्ये झोपावे लागत होते, असे रौफने सांगितले.
5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ -
5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.