U19 Women's T20 World Cup Final : दक्षिण आफ्रिकेत सुरु 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली आहे. भारतानं संपूर्ण इंग्लंड संघाला अवघ्या 68 धावांत गुंडाळलं आहे. त्यामुळे आता विश्वचषक विजयासाठी भारतासमोर 69 धावांचे माफक आव्हान आहे. भारताच्या सर्वच महिलांनी उत्तम गोलंदाजी केली. यामध्ये तीतस साधूने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 6 धावा देत दोन विकेट्सही घेतल्या. अर्चना देवी, पार्शवी चोप्रा यांनीही प्रत्येकी दोन मन्नत कश्यप, शेपाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. इंग्लंडकडून रॅना हिने सर्वाधिक 19 धावा केल्या.
तर भारत आणि इंग्लंड हा अंडर 19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे खेळवला जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघाचा स्पर्धेतील फॉर्म पाहता ही फायनल अगदी चुरशीची आणि रंगतदार होईल असं वाटत होतं. पण भारतानं पहिल्या हाल्फमध्ये एकतर्फी खेळ दाखवला आहे. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी निवडली. कर्णधाराच्या निर्णयाला साजेशी खेळी करत भारतीय महिलांनी सुरुवातीपासून इंग्लंडच्या खेळाडूंना तंबूत धाडणं सुरु ठेवलं. 17.1 षटकांत संपूर्ण इंग्लंडचा संघ 68 धावांवर सर्वबाद झाला असून आता 69 धावांचं माफक लक्ष्य पार करण्यासाठी भारत मैदानात आला आहे.
भारताची विश्वचषकातील कामगिरी
आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारताच्या कामगिरीचा विचार करता सुरुवातीपासून भारताने चांगली कामगिरी केली आहे. भारताचा संघ ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्यानंतर स्पर्धेत एकही सामना न गमावलेल्या न्यूझीलंडला भारतानं आठ विकेट्स राखून मात देत सामना जिंकला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला. दुसरीकडे इंग्लंड संघाचा विचार करता त्यांनीही आपल्या नावाला साजेशी खेळी सुरुवातीपासून केली होती. सेमीफायनलमध्ये त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान होतं, जे देखील त्यांनी पार करत फायनल गाठली आहे. आता आज फायनल जिंकून विश्वचषक उंचावण्यासाठी भारत आणि इंग्लंडच्या महिला आमने-सामने आहेत.
फायनलसाठी कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय महिला संघ -शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता शेहरावत, सौम्या तिवारी, गोंगडी त्रिशा, ऋचा घोष (विकेटकीपर), हृषिता बसू, तीतस साधू, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्शवी चोप्रा, सोनम यादव
इंग्लंड महिला संघ - ग्रेस स्क्रिव्हन्स (कर्णधार), लिबर्टी हीप, नियाम फिओना हॉलंड, सेरेन स्माले (विकेटकीपर), रायना मॅकडोनाल्ड गे, चॅरिस पावली, अलेक्सा स्टोनहाउस, सोफिया स्मेल, जोसी ग्रोव्हस, एली अँडरसन, हन्ना बेकर
हे देखील वाचा-