IND vs WI, 2nd ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज होत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. यामध्ये पहिल्या सामन्यात भारताने संघाने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून भारताला मालिका खिशात घालण्याची संधी आहे. तर वेस्ट इंडिजला 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान आहे. दरम्यान, या सामन्यात चाहत्यांच्या नजरा या संघात पुनरागमन करणाऱ्या उपकर्णधार के एल राहुलच्या फलंदाजी क्रमावर असणार आहेत.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा डाव 176 धावांत गुंडाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या 60 धावांच्या जोरावर भारताने सहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. दुसरा वनडे सामना सुरू होण्यापूर्वी के एल राहुलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तर मयांक अगरवाल देखील निवडीसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात कोण करणार हा प्रश्न संघ व्यवस्थापकांसमोर आहे. पहिल्या वनडे सामन्यात के एल राहुल उपलब्ध नव्हता. त्यामुळे ईशान किशन डावाची सुरुवात करण्यासाठी आला होता. मागच्या सामन्यात ईशान किशनने रोहित शर्मा सोबत डावाची सुरुवात करत भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या गड्यासाठी दोघांमध्ये 84 धावांची भागीदारी झाली होती. यादरम्यान ईशान किशनने 28 धावांची खेळी केली होती.
चहल आणि वॉशिंग्टन यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. आज फिरकीपटू कुलदीप यादवला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पहिल्या सामन्यातील पराभव विसरून वेस्ट इंडिजच्या नजरा चांगल्या कामगिरीवर असणार आहेत. गेल्या 16 सामन्यांमध्ये रविवारी 10 व्यांदा वेस्ट इंडिजचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. त्यामुळे पोलार्डच्या नेतृत्वाखालील संघाला सुधारणा करावी लागणार असून, फलंदाजांना जबाबदारीने खेळावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : कर्णधार हार्दिक पांड्याच्या संघाचं नाव ठरलं!
- Womens IPL : पुढच्या वर्षी येणार महिला आयपीएल? बीसीसीआय सचिवांचं मोठं वक्तव्य