Tim Paine Quits As Australia Test Captain  प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेआधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. एका महिलेला अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले असल्याचा आरोप टिम पेन याच्यावर लावण्यात आला होता. या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने चौकशी सुरू केली. त्यानंतर आता टिम पेनने शुक्रवारी आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. उपकर्णधार पॅट कमिन्स कडे आता अॅशेस मालिकेत संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. 


टिम पेन यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचे प्रकरण वर्ष 2017 मधील आहे. या दरम्यानच टिम पेनला सात वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी टिम पेनला क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट टास्मानियाने क्लिन चीट दिली होती. 


टिम पेनने पत्रकार परिषदेत म्हटले की, हे प्रकरण संपले असावे असे मला वाटले. त्यामुळे माझे संपूर्ण लक्ष या संघाच्या बांधणीवर होते. मात्र, माझे खासगी मेसेज हे सार्वजनिक झाले असल्याचे मला नुकतेच समजले आहे. वर्ष 2017 मध्ये माझ्याकडून झालेल्या कृत्यामुळे  ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावर राहण्यासाठी पात्र नाही असे टिम पेनने म्हटले. मी पत्नी, माझे कुटुंबीय आणि अन्य जणांना दु:ख दिल्याबद्दल मी माफी मागतो. या खेळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवल्याबद्दलही माफी मागत असल्याचे त्यांनी म्हटले.


येत्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान प्रतिष्ठेची समजली जाणारी अॅशेस मालिका सुरू होणार आहे. पहिली कसोटी 8 डिसेंबर रोजी ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी पेन ऑस्ट्रेलियन संघात कायम असणार आहे. क्रिकेट बोर्डाने टिम पेनचा राजीनामा स्वीकारला आहे. 


क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काय म्हटले?


क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख रिचर्ड फ्रेडेन्स्टेन यांनी म्हटले की, टिम पेन यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. काही वर्षांपूर्वी या प्रकरणात पेन याला क्लिन चीट देण्यात आली होती. मात्र त्याच्या निर्णयाचा सन्मान करत असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. 


टिम पेन याला 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर स्टिव्ह स्मिथच्या जागी त्याची कर्णधारपदी वर्णी लावण्यात आली. सन 2019 मध्ये झालेल्या अॅशेज मालिकेतही टिम पेनने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. टिम पेनने एकूण 23 कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले. यामध्ये 11 सामन्यांमध्ये विजय आणि 8 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तर, चार सामने अनिर्णित राहिले. 


संबंधित वृत्त:


AB de Villiers Retirement : मिस्टर 360 डिग्री... साऊथ आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सची निवृत्तीची घोषणा


टी-20 विश्वचषकात मैदान गाजवणारा मॅथ्यू वेड क्रिकेटला करणार अलविदा; 'या' स्पर्धेनंतर घेणार संन्यास



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha