AB de Villiers Retirement : साऊथ आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. एबी डिव्हिलियर्सनं बराच काळापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु, आता क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच, आता एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर बंगळुरु संघाकडून आयपीएलमध्ये खेळत होता. 



एबी डिव्हिलियर्सनं ट्वीट केलंय की, "हा अविश्वसनीय प्रवास होता. परंतु, मी सर्व क्रिकेटच्या प्रकारातून निवृत्ती घेतोय. मी माझ्या बॅकयार्डमध्ये माझ्या मोठ्या भावांसोबत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासूनच मी पूर्ण आनंद आणि उत्साहासह हा खेळ खेळलो आहे. आता 37 वर्षांच्या वयात मी त्याच फॉर्मात तेवढ्याच वेगानं खेळू शकत नाही." यासोबतच एबी डिव्हिलियर्सनं सर्वांना धन्यावाद असं म्हटलं आहे. 


37 वर्षांच्या एबी डिविलियर्स आयपीएलच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. एबीनं 184 आयपीएल सामन्यांमध्ये 39.70 च्या सरासरीनं 5162 धावा केल्या. ज्यामध्ये तीन शतक आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल 14 च्या पहिल्या सत्रात एबी डिव्हिलियर्सनं धडाकेबाज खेळी केली होती. या दरम्यान, एबी डिव्हिलियर्सनं सात सामन्यांमध्ये एकूण 207 धावा केल्या होत्या. दरम्यान, दुसऱ्या सत्रात मात्र एबी डिव्हिलियर्स फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्स आरसीबी व्यतिरिक्त दिल्ली डेयरविल्सकडूनही खेळताना दिसला होता. 


दरम्यान, एबी डिविलियर्सनं 2018 मध्ये अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. 114 कसोटी सामने, 228 एकदिवसीय सामने आणि 78 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या एबी डिविलियर्सचा समावेश धमाकेदार फलंदाजांमध्ये समावेश होतो. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डिविलियर्सनं 47 शतकं झळकावली आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :