India Tour Of West Indies : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. भारताकडून दोन कसोटी सामन्यात तीन शतकांची नोंद झाली. यशस्वी जयस्वाल याने पदार्पणात १७१ धावांचे योगदान दिले. त्याशिवाय रोहित शर्माने पहिल्या कसोटीमध्ये शतक झळकावले तर दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. विराट कोहलीने पहिल्या कसोटीमध्ये अर्धशतक झळकावले तर दुसऱ्या कसोटीत शतक ठोकले. रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन यांनी अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले. या सकारात्मक बाबी असल्या तरी अजिंक्य रहाणे आणि शुभमन गिल यांनी निराशाजनक कामगिरी केली. रहाणे आणि गिल यांची बॅट शांतच राहिली.
दुसऱ्या कसोटी सामन्यात कोणत्या फलंदाजाने कशी कामगिरी केली ?
पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात १८१ धावांवर डाव घोषित केला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली होती. विराट कोहलीने १२१ धावांची खेळी केली होती. तर यशस्वी जयस्वाल याने ५७ धावा जोडल्या होत्या. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा याने ८० धावांची दमदार खेळी केली होती. रविंद्र जाडेजा याने ६१ धावांचे योगदान दिले होते. तर अश्विन याने अर्धशतक ठोकले होते. इशान किशन याला फक्त २५ धावा करता आल्या होत्या. दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी अर्धशतके झळकावली. रोहित शर्माने ५७ तर इशान किशन याने ५२ धावांची खेळी केली. शुभमन गिल २९ धावांवर नाबाद राहिला. यशस्वी जयस्वाल ३८ धावांचे योगदान दिले.
पहिल्या कसोटीमध्ये काय झालं ?
पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता. यशस्वी जयस्वाल याने पदार्पणातच दीडशतकी खेळी केली होती. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ४२१ धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये यशस्वी जयस्वाल याने १७१ धावांची खेळी केली होती. यशस्वी जयस्वाल याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यातही आले होते. रोहित शर्मा यानेही १०३ धावांची शतकी खेळी केली होती. विराट कोहलीने ७६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर रविंद्र जाडेजा ३७ धावांवर नाबाद होता.
शुभमन गिल-अजिंक्य रहाणे फ्लॉप -
वेस्ट इंडिजविरोधातील दोन्ही कसोटी सामन्यात उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि सलामी फलंदाज शुभमन गिल यांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. अजिंक्य रहाणेला दोन्ही कसोटीत दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. पहिल्या कसोटीमध्ये अजिंक्य रहाणे फक्त तीन धावा काढून बाद झाला होता. दुसऱ्या कसोटीमध्ये अजिंक्य रहाणे याला फक्त आठ धावाच करता आल्या. दोन कसोटीत दोन डावात अजिंक्य रहाणे याला फक्त ११ धावा करता आल्या. शुभमन गिल यानेही निराशाजनक कामगिरी केली. शुभमन गिल याला पहिल्या कसोटीत फक्त सहा धावांचे योगदान देता आले. गिल याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात दहा धावा केल्या तर दुसऱ्या डावात २९ धावांचे योगदान दिले. गिल याला दोन कसोटीतील तीन डावात ४५ धावा करता आल्या.