Ishan Kishan Rishabh Pant India vs West Indies : दुसऱ्या कसोटी सामन्यात ईशान किशन याने विस्फोटक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. पहिल्या डावातील आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारताने टी २० स्टाईल फलंदाजी केली. भारतीय फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ईशान किशन याला प्रमोट करत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते. ईशान किशन याने या संधीचं सोनं करत दमदार अर्धशतक झळकावले. ईशान किशन याचं हे कसोटी करिअरमधील पहिले अर्धशतक होय. हे अर्धशतक ईशान किशनसाठी खास राहिलेय. पण त्यापेक्षा विशेष बाब म्हणजे, ईशान किशन याने ज्या बॅटने शतक ठोकले ती बॅट सध्या चर्चेत आहे. ईशान किशन याने ऋषभ पंत याच्या बॅटने अर्धशतक ठोकलेय का ? अशी चर्चा सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्सने एक पोस्ट शेअर केल्यानंतर या चर्चेला उधाण आलेय.
मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ऋषभ पंतची बॅट दिसत आहे. अर्धशतकानंतर ईशाननेही पंतचे आभार मानले आहेत. मुंबईने ऋषभ आणि ईशानचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऋषभ आणि ईशान यांच्याकडे एकच बॅट दिसत आहे. या फोटोला 10 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. भारताकडून दुसऱ्या डावात ईशानने 34 चेंडूंचा सामना करत नाबाद 52 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. सामना संपल्यानंतर ईशानने ऋषभचे आभारही मानले.
ईशान किशन याने याआधीच एकदिवसीय आणि टी-२० मध्ये पदार्पण केले होते. पण कसोटीमध्ये त्याला संधी मिळत नव्हती. आता त्याने कसोटी पदार्पणही केले. ईशानने जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. याआधी T20 मध्ये मार्च 2021 मध्ये पदार्पण झाले होते. इशानने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. ईशानने भारतासाठी 27 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये 653 धावा केल्या. त्याने 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये 510 धावा केल्या आहेत.
सामना रंगतदार स्थितीत -
चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकांत 2 बाद 76 धावांपर्यंत मजल मारली. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आता शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला 289 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला विजयासाठी 8 विकेट्स घ्याव्या लागतील. तत्पूर्वी, भारताने 2 बाद 179 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. भारताकडून इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतके झळकावली. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट आणि कर्क मॅकेन्झी यांना बाद करण्यात भारताला यश आलेय. या दोन्ही फलंदाजांना ऑफस्पिनर रवी अश्विनने याने तंबूचा रस्ता दाखवला. क्रेग ब्रॅथवेटने 52 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. तर मॅकेन्झी एकही धाव न काढता पायचीत झाला. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर चंद्रपॉल आणि ब्लॅकवूड नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले. तेगनारायण चंद्रपॉल २४ धावा करून खेळत आहे. ब्लॅकवूड 20 धावा करून नाबाद परतला.
त्यापूर्वी, भारताने 2 बाद 179 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी 365 धावांचे लक्ष्य दिले. दुसऱ्या डावात भारतासाठी कर्णधार रोहित शर्माशिवाय इशान किशनने अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्माने 44 चेंडूत 57 धावांची खेळी केली. तर इशान किशन 34 चेंडूत 52 धावा करून नाबाद परतला. वेस्ट इंडिजकडून शॅनन गॅब्रिएल आणि जोमेल वॅरिकन यांना 1-1 असे यश मिळाले. त्याचवेळी, याआधी भारताने पहिल्या डावात 438 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 255 धावांवर आटोपला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने नेत्रदीपक गोलंदाजी सादर केली. मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 5 खेळाडूंना तंबूत पाठवले होते.