Australia won Ashesh Series : अॅशेस मालिकेतल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुव्वा उडवला. एक डाव आणि 14 धावांनी ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंडच्या तिखट माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. बोलंडने चार षटकात सात धावा देत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 68 धावांमध्ये आटोपला. अवघ्या अडीच दिवसात ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटीसह मालिकाही खिशात घातली. बोलंडला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.


कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने 185 धावा केल्या होत्या. त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाचा डावा 267 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 82 धावांची आघाडी मिळाली. मात्र, स्कॉट बोलंडच्या माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. कर्णधार जो रूट  आणि बेन स्टोक्स या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. रुटने सर्वाधिक 28 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बोलंडने 7 धावांत 6 गडी बाद केले. तर, स्टार्कने 3 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. 






या आधी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने दुसऱ्या डावात चार गडी गमावून 31 धावा केल्या होत्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पराभव वाचवण्याची जबाबदारी कर्णधार जो रूट आणि बेन स्टोक्स यांच्यावर होती. इंग्लंडला पहिला धक्का बेन स्टोक्सच्या रुपाने लागला. स्टार्कने बेन स्टोक्स 11 धावांवर त्रिफळाचित केले. त्यानंतर स्कॉट बोलंडने इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. बोलंडने अवघ्या 11 चेंडूमध्ये जॉनी बेअरस्टो, मार्क वूड आणि ऑली रॉबिन्सन यांना तंबूत धाडले. कॅमरन ग्रीनने जेम्स अँडरसरनला बाद करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha