गयाना : भारतानं (Team India) गतविजेत्या इंग्लंडचा (England) 68 धावांनी धुव्वा उडवत टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मॅचपूर्वी भारतीय चाहत्यांना एकाच गोष्टीची भीती होती. ती म्हणजे 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये जे घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये. भारतानं फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टींमध्ये दमदार कामगिरी करत इंग्लंडला 68 धावांनी पराभूत केलं. रोहित शर्मा (Rohit Sharma ) इंग्लंडला पराभूत झाल्यानंतर भावूक झाल्याचा पाहायला मिळाला. रोहित शर्माला 2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये पराभवानंतर अश्रू अनावर झाले होते. 


टीम इंडियानं रोहितच्या अश्रूंच्या थेंबांचा बदला घेतला


जोस बटलर आणि एलेक्स हेल्सच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडनं भारताला 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत केलं होतं. भारताला पराभवाचा जोरदार धक्का बसला होता. रोहित शर्माला त्यावेळी पराभवामुळं अश्रू अनावर झाले होते. ती मॅच अॅडिलेडमध्ये झाली होती. यावेळी भारतीय संघ 2022 च्या पराभवाचा वचपा काढायचा या इराद्यानं मैदानात उतरला होता. इंग्लंडला 103 धावांवर बाद करत भारतानं रोहित शर्माच्या अश्रूंच्या एका एका थेंबाचा वचपा काढला. 


रोहित शर्माची दमदार फलंदाजी


रोहित शर्मानं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये वनडे वर्ल्ड कप प्रमाणं आक्रमक फलंदाजी सुरु ठेवली आहे. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर  171 धावा केल्या.  विराट कोहली आणि रिषभ पंत बाद झाल्यानंतर रोहित शर्मानं सूर्यकुमार यादवच्या साथीनं 73 धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने कर्णधार पदाला साजेशी खेळी करत 57 धावा केल्या. रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध 92 धावांची खेळी केली होती.  


भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा काढला होता. यानंतर आता इंग्लंडला देखील पराभूत करत भारत अंतिम फेरीत पोहोचला आहे.  




भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने


भारत आणि दक्षिण आफ्रिका आता अंतिम फेरीच्या लढतीत आमने सामने येणर आहेत. भारतानं आतापर्यंत स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारत आयसीसी स्पर्धेतील विजेतेपदाचा गेल्या 10 वर्षांचा दुष्काळ संपवण्यात यशस्वी ठरणार का हे पाहावं लागेल. रोहित शर्मा आणि टीम इंडिया प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टी 20 वर्ल्ड कप विजेतेपदाचं गिफ्ट देऊ शकणार का हे लवकरच स्पष्ट होईल. 


संबंधित बातम्या : 


Virat Kohli : विराट कोहलीला रोहित शर्माचा फुल सपोर्ट, हिटमॅननं दक्षिण आफ्रिकेचं टेन्शन वाढवणारी अपडेट दिली

Axar Patel : हम है सीधे साधे 'अक्षर अक्षर' , आधी बॅटिंगमध्ये चमक दाखवली, मग गोलंदाजीत कमाल, अक्षर पटेलचा जलवा