Team India Squad For T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आज शनिवार 20 डिसेंबर रोजी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार असून, याच बैठकीत वर्ल्ड कपसाठी भारतीय संघावर शिक्कामोर्तब होईल.

Continues below advertisement

गेल्या काही महिन्यांतील टी20 संघातील खेळाडूंची कामगिरी पाहता निवड फार कठीण ठरणार नाही, असे चित्र आहे. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवची खराब फॉर्म ही निवड समितीसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळेच सर्वांच्या नजरा या गोष्टीकडे लागल्या आहेत की सूर्यकुमारवर एखादा मोठा निर्णय घेतला जाणार का?

मुंबईत होणार निर्णायक बैठक

Continues below advertisement

शनिवारी बीसीसीआय मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला पाचही निवडकर्ते उपस्थित राहणार आहेत. सध्याचे कर्णधार सूर्यकुमार यादव देखील या बैठकीचा भाग असण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषदेत अजित आगरकर संघाची अधिकृत घोषणा करतील. बीसीसीआयने याबाबत शुक्रवारीच माहिती दिली असून, या पत्रकार परिषदेला सूर्यकुमार यादव देखील उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सूर्यकुमार यादवचं कर्णधारपद जाणार?

संघाच्या घोषणेच्या अवघ्या एक दिवस आधी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या शेवटच्या टी20 सामन्यात जे घडले, त्यानंतर सूर्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने 30 धावांनी विजय मिळवला, मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला केवळ 7 चेंडूत 5 धावा करून माघार घ्यावी लागली. संपूर्ण मालिकेत सूर्या 4 डावांत फक्त 34 धावा करू शकला. एवढेच नव्हे, तर 2025 मध्ये त्याने 21 डावांत 13.62 ची सरासरी आणि 123 चा स्ट्राइक रेट ठेवत केवळ 218 धावा केल्या असून, एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. यामुळे मोठा प्रश्न निर्माण होतो.

मग प्रश्न असा आहे की सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवले जाईल का? निवड समिती काही धक्कादायक निर्णय घेणार का? हार्दिक पांड्याला पुन्हा नेतृत्वाची संधी मिळणार का, ज्याने या मालिकेत बॅट आणि बॉल दोन्हीने जबरदस्त पुनरागमन केले?

मात्र प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्या आतापर्यंतच्या भूमिकेवर नजर टाकल्यास, अशी शक्यता फार कमी दिसते. वर्ल्डकप इतका जवळ असताना आणि दीड वर्षांपासून कर्णधार असलेल्या सूर्यकुमारलाच कायम ठेवले जाईल, असेच संकेत आहेत.

पीटीआयच्या एका वृत्तानुसार, सूर्यकुमारची कर्णधारपदाची कारकीर्द फक्त या टी20 वर्ल्ड कपपर्यंतच मर्यादित असू शकते. त्यामागे त्याची सध्याची फॉर्म आणि वाढते वय ही दोन मोठी कारणे आहेत. सध्या तो 35 वर्षांचा असून, पुढील टी20 वर्ल्ड कपवेळी तो 37 वर्षांचा असेल.

कोणाचा पत्ता कट होणार?

संघातील इतर खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास, उपकर्णधार शुभमन गिलवर पण टांगती तलवार आहे. त्यालाही या वर्षात टी20 आंतरराष्ट्रीयत एकही अर्धशतक करता आलेले नाही. त्याच्यामुळे संजू सॅमसनला प्लेइंग-11 बाहेर बसावे लागले, तर यशस्वी जैस्वालला तर स्क्वॉडमध्येही जागा मिळत नाहीये. तरीही, शुभमन गिलला वगळण्याची शक्यता कमीच मानली जात आहे. याचा फटका पुन्हा एकदा यशस्वी जैस्वालला बसू शकतो. याशिवाय नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग आणि मोहम्मद सिराज यांनाही मुख्य संघाऐवजी रिझर्व्ह खेळाडूंची भूमिका स्वीकारावी लागू शकते.

टीम इंडियाचा संभाव्य संघ (Team India's Probable Squad) : 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.