Hardik Pandya and Cameraman Ind vs Sa 5th T20 : भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने शुक्रवार 19 डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या वादळी फलंदाजीने अक्षरशः कहर माजवला. मात्र या सामन्यातील त्याच्या खेळाइतकेच त्याच्या एका कृतीने चाहत्यांची मने जिंकली.

Continues below advertisement

कॅमेरामनसाठी दाखवलेली माणुसकी, फॅन्स भारावले

सामन्यादरम्यान हार्दिकच्या एका षटकाराचा चेंडू डगआउटजवळ उभ्या असलेल्या कॅमेरामनला लागला, त्यामुळे त्याला दुखापत झाली. सामना संपताच हार्दिक थेट त्या कॅमेरामनकडे गेला आणि त्याची आपुलकीने विचारपूस केली. त्याने त्याला मिठी मारली, इतकेच नाही तर ज्या ठिकाणी चेंडू लागला होता त्या डाव्या खांद्यावर स्वतः आयस पॅकही लावला. हार्दिकच्या या खेळभावनेचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत असून, कॅमेरामनच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधानाचे हास्य असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

ऐतिहासिक फलंदाजी, विक्रमी अर्धशतक

या सामन्यात हार्दिक पांड्याची बॅट काही थांबली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची त्याने चांगलीच धुलाई केली. 13व्या षटकात भारताची अवस्था 115 धावांत 3 गडी बाद अशी असताना हार्दिक मैदानात उतरला आणि पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत आपल्या इराद्यांचा स्पष्ट इशारा दिला. अवघ्या 16 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले, जे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय फलंदाजाचे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. हार्दिकने 25 चेंडूंत 63 धावांची स्फोटक खेळी केली, ज्यात पाच षटकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावर भारताने 231 धावांचा भलामोठा स्कोअर उभारला.

गोलंदाजीतही प्रभाव, मालिकेवर भारताचा कब्जा

हार्दिकचा प्रभाव केवळ फलंदाजीपुरता मर्यादित राहिला नाही. गोलंदाजीतही त्याने भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेचा धोकादायक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस (17 चेंडूंत 31 धावा) सामना भारताकडून खेचून नेण्याच्या तयारीत होता, पण हार्दिकने त्याचा मोलाचा विकेट घेतला. अखेर भारताने हा सामना 30 धावांनी जिंकत मालिका 3-1 अशी आपल्या नावावर केली. या शानदार अष्टपैलू कामगिरीसाठी हार्दिक पांड्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी दावेदारी मजबूत 

या दमदार विजयासह आता सर्वांचे लक्ष टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी होणाऱ्या भारतीय संघ निवडीकडे लागले आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती शनिवारी 20 डिसेंबर रोजी मुंबईत बैठक घेणार असून अंतिम संघावर शिक्कामोर्तब होणार आहे. हार्दिक पांड्याने आपल्या सध्याच्या फॉर्ममुळे  आपली जागा जवळपास पक्की केली आहे.

हे ही वाचा -

IND vs SA 5th T20 : हार्दिक–तिलकचं वादळ, वरुणचा कहर; नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा फडशा पाडला, मालिका 3-1 ने जिंकली