South Africa beat India 2nd T20 : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला 51 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय भारताला चांगलाच महागात पडला. क्विंटन डी कॉकच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 213 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. त्यानंतर तिलक वर्मा वगळता एकाही भारतीय फलंदाजाकडून लढाऊ खेळी पाहायला मिळाली नाही. कोच गौतम गंभीरचा अक्षर पटेलला क्रमांक 3 वर पाठवण्याचा प्रयोगही पूर्णपणे फसला.

Continues below advertisement

अर्शदीप-बुमराहची धुलाई...

Continues below advertisement

दुसऱ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहची दक्षिण आफ्रिकेने चांगलीच धुलाई केली. अर्शदीपने 4 षटकांत तब्बल 54 धावा दिल्या, तर बुमराहनेही 45 धावा खर्च केल्या. अर्शदीपने एका षटकात 7 वाइडसह तब्बल 13 चेंडू टाकले. दोघांच्या खराब गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या तीन षटकांत 49 धावा ठोकल्या.

गिल-सूर्याचा फ्लॉप शो

उपकर्णधार शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म टीम इंडियाच्या चिंतेत भर घालत आहे. दोघेही पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरले. गिल शून्यावर तर सूर्या केवळ 5 धावांवर बाद झाला. 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने जलदगतीने विकेट्स गमावल्याने संपूर्ण संघ दडपणाखाली गेला.

अक्षर पटेल आणि हार्दिकची संथ खेळी...

अक्षर पटेलने अत्यंत संथ खेळी केली. 21 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने त्याने 21 धावा केल्या. मागील सामन्यात तुफान खेळी करणारा हार्दिक पांड्या देखील संघर्ष करताना दिसला. त्याने 23 चेंडूत 20 धावा केल्या.

गौतम गंभीरची अपयशी रणनीती 

शुभमन गिल पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवण्यात आले. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांसारखे सेट फलंदाज उपलब्ध असताना अक्षरवर विश्वास ठेवणे हे बरेच आश्चर्यकारक आणि धोकादायक ठरले. गौतम गंभीर कोच झाल्यापासून असे प्रयोग वारंवार पाहायला मिळत आहेत, आणि पुन्हा एकदा हा प्रयोग भलताच फसला.

हे ही वाचा -

Team India : विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाची गौतम गंभीरमुळे वाट?; टीममध्ये सारखी उलथापालथ, वर्ल्डकपच्या तोंडावर अजून पक्की नाही Playing XI, नेमकं तरी चाललंय काय?