India vs South Africa 2nd T20 : न्यू चंदीगड मुल्लापुर येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव करून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवलेल्या टीम इंडियाला या सामन्यात मात्र सर्वच विभागात अपयशाला सामोरे जावे लागले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने आधी गोलंदाजांना धू-धू धुतले. क्विंटन डी कॉकच्या जोरावर त्यांनी भारतासमोर 214 धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर भारतीय फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. कर्णधार सूर्यकुमार यादव, सलामीवीर शुभमन गिल आणि इतर प्रमुख खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव केला. 

Continues below advertisement

Continues below advertisement

क्विंटन डी कॉकने भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतले

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने जबरदस्त सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये रीजा हेंड्रिक्सचे विकेट गमावूनही त्यांनी जोरदार पुनरागमन केले. कर्णधार एडेन मार्करमने 26 चेंडूत 29 धावा केल्या, तर डेवाल्ड ब्रेविस 14 धावांवर बाद झाला. मात्र, ओपनर क्विंटन डी कॉकने भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतले आणि 46 चेंडूत 90 धावांची तुफानी खेळी केली. त्यात 7 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता.

डोनोवन फरेरा आणि डेविड मिलरचा शेवटी तडाखा

डी कॉक बाद झाल्यानंतर डोनोवन फरेरा आणि डेविड मिलर यांनी अखेरच्या षटकात तुफानी फटकेबाजी केली आणि संघाला 200 च्या पलीकडे नेले. फरेराने 16 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह 30* धावा केल्या, तर मिलरने केवळ 12 चेंडूत 20* धावा ठोकल्या. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात 213 धावा करत भारतासमोर 214 धावांचे आव्हान ठेवले.

अर्शदीप सिंगचा लाजिरवाणा विक्रम 

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताकडून सर्वात निराशाजनक कामगिरी जर कोणाची असेल तर ती अर्शदीप सिंगची. आफ्रिकी डावातील 11वे षटक टाकण्यासाठी जेव्हा अर्शदीप आला, तेव्हा त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार बसला. त्यानंतर तर तो पूर्णपणे लयबाहेर गेला. एकट्या या षटकात त्याने तब्बल 7 वाइड्स टाकत प्रतिस्पर्धी संघाला 7 मोफत धावा दिल्या. एकूण सामन्यात अर्शदीपने 4 षटकांत 9 वाइड बॉल्स टाकल्या, ज्या भारतासाठी डोकेदुखीच ठरल्या.

भारतीय संघाची पुन्हा खराब सुरुवात

धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात फारच खराब झाली. उपकर्णधार शुभमन गिल तर खातेही उघडू शकले नाहीत आणि लुंगी एनगिडीने त्याची विकेट घेतली. तर अभिषेक शर्मा (17) याने काही धावा केल्या, पण त्यालाही मार्को जानसेनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जानसेनने यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (5) ला बाद करत टीम इंडिया मोठ्या अडचणीत आणली. सूर्या बाद होईपर्यंत भारताचा स्कोर फक्त 32/3 असा होता.  

तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं अस्मान दाखवलं

यानंतर अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी 35 धावांची महत्त्वाची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अक्षरने संयमी खेळ करत 21 धावा केल्या, पण ओटनील बार्टमॅनने त्याचीही विकेट घेतली. तिलक वर्मा मात्र एकाकी लढत देत राहिला. त्याने फक्त 27 चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. पण दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. हार्दिक पांड्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असतानाही तो 23 चेंडूंमध्ये केवळ 20 धावा करत आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेकडून ओटेनले बार्टमनने चार, तर लुंगी एनगिडी, मार्को जानसेन आणि लुथो सिपामला यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

हे ही वाचा -

Arshdeep Singh : 13 चेंडूची एक ओव्हर! अर्शदीप सिंगची लाइन-लेंथ बिघडली; गौतम गंभीर संतापला, रगात काय बोलून गेला... पाहा Video