India vs Bangladesh 2nd Test: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात गुरुवारपासून दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतानं 188 धावांनी जिंकला. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचे फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. अशा स्थितीत यजमान संघाचे फलंदाज दुसऱ्या कसोटीसाठी जोरदार तयारी करत आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) बांगलादेशचा फलंदाज मुशफिकूर रहीमला (Mushfiqur Rahim) बॅटिंग टिप्स देताना दिसला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होतोय.
मुशफिकुर रहीमचा फॉर्म गेल्या काही काळापासून बांगलादेशच्या संघासाठी चिंतेचा विषय ठरतोय. भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेतही त्याची बॅट शांत होती. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्यानं अनुक्रमे 18,12, 07 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या कसोटी सामन्यातही त्यानं 28 आणि 23 धावा केल्या. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होतेय. यापूर्वी राहुल द्रविड मुशफिकूर रहीमला बॅटिंग टिप्स देताना दिसला.
व्हिडिओ-
भारताची मालिकेत आघाडी
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 1-0 नं आघाडीवर आहे. भारतानं पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 404 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारतानं दोन बाद 258 धावा करून डाव घोषित केला. दरम्यान, 513 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 324 धावांवर ढेपाळला.
डब्लूटीसीच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला जिंकणं आवश्यक
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरी पात्र होण्याच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला दुसरी कसोटीही जिंकणं आवश्यक आहे. या सामन्यातही भारतीय संघ नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ज्यामुळं पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसला. दुसऱ्या सामन्यातही केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
हे देखील वाचा-