Jason Holder Included West Indies Squad: 2016 टी-20 विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिजची 2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेत वाईट अवस्था आहे. दोन वेळचा चॅम्पियन संघ या विश्वचषकात अद्याप विजयाचे खाते उघडू शकलेला नाही. त्याला आधी इंग्लंडविरुद्ध वाईट रीतीने पराभवाला सामोरे जावे लागले आणि नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही पराभव पत्करावा लागला. दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या करा किंवा मराच्या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. वास्तविक, वेगवान गोलंदाज ओबेड मॅकॉयच्या दुखापतीनंतर माजी कर्णधार जेसन होल्डरचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने होल्डरला संघात मॅकॉयच्या जागी परवानगी दिली आहे.


या स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाने सुपर 12 मधील दोन सामने गमावले आहेत. त्याचवेळी, इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मॅकॉयला पायाच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. संघासोबत प्रवास करण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला होल्डर गुरुवारी उर्वरित संघात सहभागी होईल आणि शुक्रवारच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी त्याची निवड होईल.


IPL 2021 च्या उत्तरार्धात केला होता धमाका
संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात सनरायझर्स हैदराबादसाठी जेसन होल्डरने चमकदार कामगिरी केली. त्याने स्पर्धेतील आठ सामन्यांत 16 बळी घेतले. याशिवाय फलंदाजीच्या जोरावर 85 धावाही केल्या. त्याची फलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी नाबाद 47 होती.


दक्षिण आफ्रिकेची वेस्ट इंडिजवर 8 विकेटने मात
दक्षिण आफ्रिकेने (South Africa) 26 ऑक्टोबरला मंगळवारी वेस्ट इंडिजचा (West Indies)आठ विकेट्सनी धुव्वा उडवून  ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आपला पहिला विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेचा हा पहिल्या गटातला दुसरा सामना होता. या गटातल्या सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाकडून पाच विकेट्सनी हार स्वीकारावी लागली होती. विंडीजविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांनी कमाल केली.


उपांत्य फेरी आणि अंतिम वेळापत्रक
10 नोव्हेंबर: पहिली उपांत्य फेरी
11 नोव्हेंबर: दुसरी उपांत्य फेरी
14 नोव्हेंबर: फायनल
15 नोव्हेंबर: अंतिम फेरीसाठी राखीव दिवस