ICC T-20 World Cup 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसी टी -20 वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होणार नाही हे आता निश्चित झालं आहे. टी - 20 वर्ल्ड कप आता दुबईत खेळवला जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने आज आयसीसीला दिली आहे. आता वर्ल्डकपचं वेळापत्रक आयसीसीकडून जारी केलं जाईल, अशी माहिती बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी दिली.

  






कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी 20 वर्ल्डकप भारताबाहेर होणार हे आधीच बोललं जात होतं. दुबईत ही स्पर्धा हलवली जाऊ शकते अशीही चर्चा होती, ती खरी ठरली. आयपीएल स्पर्धा संपताच टी - 20 वर्ल्डकप सुरु होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.  


आयपीएलचे दुसर्‍या टप्प्यातील सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान युएईमध्ये होणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर अवघ्या दोन दिवसानंतर 17 ऑक्टोबरपासून टी -20 वर्ल्ड कप आयोजित केला जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. टी -20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकांसंबंधीचा अंतिम निर्णय आयसीसीकडून घेतला जाईल. अहवालानुसार अबू धाबी, शारजाह आणि दुबईमध्ये टी -20  वर्ल्डकपचे सामने आयोजित केले जातील. गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे आयसीसीने ऑस्ट्रेलियामधील प्रस्तावित 2020 टी -20 वर्ल्डकप पुढे ढकलला होता. 


एकूण 45 सामने खेळवले जाणार


टी -20 वर्ल्ड कपमध्ये 16 संघांना संधी देण्यात आली आहे. एकूण 45 सामने होणार आहेत. पहिली फेरी 8 संघांमध्ये असेल. दोन गटात 4--4 संघ असतील. एकूण 12 सामने होणार आहेत. दोन्ही गटातील अव्वल संघ सुपर-12 साठी पात्र ठरेल. येथे 12 संघ दोन गटात विभागले जातील. एकूण 30 सामने होणार आहेत. यानंतर दोन सेमीफायनल आणि फायन सामना होईल.


टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी सज्ज


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये नुकत्याच झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाची नजर टी -20 वर्ल्ड कप जिंकण्यावर असेल. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला आयसीसीचं मोठं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे टी-20 विश्वचषक जिंकून हा दुष्काळ संपविण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया या स्पर्धेत आपले सामर्थ्य दाखवेल.