IND W vs ENG W : ब्रिस्टलमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडने भारतावर आठ विकेट्सनी विजय मिळवला आहे. याबरोबर इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकांमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 50 ओवरमध्ये 201 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने लक्षाचा पाठलाग करताना आठ विकेट्स आणि 91 बॉल राखून विजय मिळवला.


इंग्लंडकडून टॅमी ब्यूमाँट (नाबाद 87) आणि नताली सायव्हर (नाबाद 74) यांनी मॅच विनिंग खेळी केली. या आधी इंग्लंडच्या लॉरेन हिल 16 धावा आणि हीदर नाईटने 18 धावा करुन बाद झाल्या. टॅमी ब्यूमोन्टने 87 धावा करताना 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर नताली सायव्हरने 74 धावांची नाबाद खेळी करताना 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. टॅमी ब्यूमाँट आणि नताली सायव्हर यांनी 119 धावांची भागीदारी रचून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून झूलन गोस्वामी आणि एकता बिष्टने प्रत्येकी एक गडी बाद केला. 


तत्पूर्वी, अनुभवी फलंदाज आणि कर्णधार मिताली राजच्या अर्धशतकामुळे भारताला इंग्लंडसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवता आले. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना मितालीने 108 चेंडूत 72 धावांची खेळी साकारत 7 चौकार लावले. तर पूनम राऊतने 32 आणि दीप्ती शर्माने 30 धावा केल्या. याशिवाय पूजा वस्त्राकर आणि शेफाली वर्मा यांनी 15-15 धावांची खेळी केली. अखेरीस भारतीय संघाने 50 षटकांत 8 बाद 201 धावा केल्या.


दरम्यान, 17 वर्षीय शफाली ही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सर्वात कमी वयात पदार्पण करणारी भारतासाठी पहिल्या, तर विश्वातील पाचव्या क्रमांकाची खेळाडू ठरली आहे.


दोन्ही संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना 30 जून रोजी टॉन्टनमध्ये खेळला जाईल. जर भारताने दुसरा सामना गमावला तर तीन सामन्यांची मालिका भारताला गमवावी लागेल.