नवी दिल्ली : आयपीएल (IPL) संपल्यानंतर एक जूनपासून टी-20 वर्ल्डकप (T 20 World Cup) पासून वेस्ट इंडिजमध्ये सुरु होणार आहे.या वर्ल्ड कपचं आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे करणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार सर्व संघांना टीमची घोषणा 1 मेपर्यंत करायची आहे. पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारताच्या टीममध्ये (Team India) कुणाला संधी मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मीडिया रिपोर्टसनुसार निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांचे लवकरच बैठक होऊ शकते. या बैठकीत वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते.
27 किंवा 28 तारखेला दिल्लीत बैठक
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार निवडसमितीचे सर्व सदस्य 27 आणि 28 एप्रिलला दिल्लीत बैठक घेऊ शकतात. 27 एप्रिलला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होणार आहे. या मॅचसाठी रोहित शर्मा देखील दिल्लीत असेल. त्यामुळं रोहित शर्मा, निवड समितीचे सर्व सदस्य आणि प्रशिक्षक वर्ल्ड कपच्या टीमवर शिक्कामोर्तब करु शकतात. निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर सध्या स्पेनमध्ये आहे. स्पेनवरुन दिल्लीला येऊन तो संघ निवडीच्या बैठकीत सहभागी होऊ शकतो.
रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज यांचं संघात स्थान पक्कं असल्याचा दावा संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. हे सर्व खेळाडू फिट असले तर त्यांना संघात स्थान मिळू शकतं. याशिवाय हार्दिक पांड्याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिक पांड्याचं प्रदर्शन कसं राहतं यावर त्याची निवड अवलंबून असेल. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या चांगली कामगिरी करु शकलेला नाही.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येकी पाच संघांचा चार ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये असेल. यामध्ये भारताशिवाय पाकिस्तान, यूएसए, कॅनडा आणि आयरलँड आहे. भारताची पहिली मॅच 5 जूनला होणार आहे. भारतापुढं आयरलँडचं आव्हान असेल. तर, हायव्होल्टेज भारत पाकिस्तान लढत 9 जूनला होणार आहे.
संबंधित बातम्या :