India announce squad for Men's T20 World Cup 2024 : आगामी टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची मंगळवारी बीसीसीआयकडून घोषणा कऱण्यात आली. मोहम्मद सिराज, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांना विश्वचषकाचं तिकिट मिळालं. पण या चारही खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. चार खेळाडूंना विश्वचषकात बेंचवर बसावं लागू शकतं. त्यामागील कारणं जाणून घेऊयात...  


ऋषभ पंत पहिली पसंत, संजू बाहेर -


टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियात विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांची निवड करण्यात आली आहे. संजू सॅमसन विकेकटकीपर म्हणून दुसरी पसंत आहे. प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संजूची दावेदारी कमकुवत दिसत आहे. टीम मॅनेजमेंट ऋषभ पंत याला प्लेईंग 11 मध्ये खेळवू शकते. त्यामागील प्रमुख कारण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संजू सॅमसनच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. संजू सॅमसन यानं सध्या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्यानं चार अर्धशतकेही ठोकली आहे, तो लयीत दिसतोय. पण दुसरीकडे पंतचे आकडेही जबरदस्त आहे. आयपीएलमध्ये त्यानं कमाल दाखवलीच आहे. त्याशिवाय टीम इंडियासाठी त्याचा रेकॉर्ड शानदार राहिलाय. त्यामुळेच ऋषभ पंत विकेटकीपर म्हणून  पहिली पसंती असेल. 


जाडेजाऐवजी अक्षर पटेलवर रोहित शर्मा विश्वास दाखवणार ?


टी20 विश्वचषकाच्या संघात अष्टपैलू अक्षर पटेल याला स्थान देण्यात आलेय. त्याशिवाय रवींद्र जाडेजा हाही अष्टपैलू फिरकी गोलंदाज आहे. आशा स्थितीमध्ये रोहित शर्माला अक्षर आणि रवींद्र जाडेजा यांच्यापैकी फक्त एकालाच प्लेईंग 11 मध्ये स्थान देता येईल. टी20 क्रिकेटमध्ये दोघांची कामगिरी एकसारखीच आहे. पण फिल्डिंग दोन्ही खेळाडूमध्ये मोठं अंतर दाखवते. रवींद्र जाडेजा फिल्डिंगमध्ये शानदार आहे. रोहित शर्मा अक्षर पटेल ऐवजी रवींद्र जाडेजा याच्यावर विश्वास दाखवू शकतो. कारण, रवींद्र जाडेजा याच्याकडे तगडा अनुभव आहे. कसोटी, वनडे आणि टी20 मध्ये जाडेजानं आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. आशा स्थितीमध्ये अक्षर पटेल याला बेंचवरच बसावे लागू शकते. 


हार्दिक की शिवम, कुणाला संधी मिळणार ?


आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी शानदार फलंदाजी करणाऱ्या शिवम दुबे याला टी20 विश्वचषकासाठी संधी देण्यात आली आहे. दुबे फलंदाजीसोबत गोलंदाजीही करु शकतो. पण दुबेची स्पर्धा थेट हार्दिक पांड्यासोबत आहे. हार्दिक पांड्याने मागील अनेक वर्षांपासून टीम इंडियासाठी अष्टपैलू खेळाडू शानदार कामगिरी केली आहे. रोहित शर्मा दुबे आणि हार्दिक यांच्यापैकी कुणाला संधी देणार याबाबत चर्चा सुरु आहे. दोघांनाही प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळेल, असाही काहींचा अंदाज आहे. 


सिराज लयीत नाही - 


वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही टी20 विश्वचषकाचं तिकिट मिळाले आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांचीही निवड झाली आहे. सिराज सध्या आपल्या फॉर्मात नाही. त्यामुळे अर्शदीप सिंह आणि बुमराह यांच्यासोबत रोहित शर्मा जाऊ शकते. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्या आपली कामगिरी बजावू शकतो. त्यामुळे सिराजला बेंचवरच बसावं लागेल.