Namibia, T20 World Cup 2024 : पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी नामिबिया संघाने क्वालिफाय केलेय. आफ्रिका क्वालिफायर्सकडून क्वालिफाय करणारा नामिबिया पहिला संघ ठरलाय. नामिबियाने पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवत 2024 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी क्वालिफाय केलेय. नामिबियासह आता टी 20 विश्वचषक खेळणाऱ्या संघाची संख्या 19 इतकी झाली आहे. आता फक्त एक स्थान खाली आहे. या एका स्थानासाठी झिम्बाब्वे, केनिया आणि युगांडा यांच्यामध्ये स्पर्धा सुरु आहे. 


रहार्ड इरास्मस याच्या नेतृत्वातील नामिबिया संघाने विश्वचषकासाठी क्वालिफाय केलेय. क्वालिफायरच्या अखेरच्या सामन्यात नामिबियाने तंजानियाचा 58 धावांनी पराभव केला.  संपूर्ण क्वालिफायर स्पर्धेत नामिबियाने शानदार कामगिरी केली. नामिबियाने संपर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवले, त्यांनी एकाही संघाला वरचढ होण्याची संधी दिली नाही. 


तंजानियाचं स्वप्न भंगलं, नामिबिया पात्र -


क्वालिफाय सामन्यात तंजानियाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. नाणेफेक गमावल्यानंतर नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सहा विकेट्सच्या मोबदल्यात 157 धावा केल्या. नामिबियाकडून जेजे स्मिट याने 25 चेंडूत 160 च्या स्टाइक रेटने नाबाद 40 धावांची खेळी केली, त्यामध्ये एक चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. या आव्हानाचा पाठलाग करताना तंजानियाचा संघ 99 धावांपर्यंत मजल मारु शकला. नामिबियाने हा सामना 58 धावांनी जिंकला. यासह तंजानियाचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले तर नामिबिया आता विश्वचषक खेळताना दिसेल. 






टी20 वर्ल्ड कप 2024 साठी कोण कोणत्या 19 संघाने क्वालिफाय केले? 


वेस्ट इंडीज, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नीदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, अफगानिस्तान, बांगलादेश, आयरलँड, स्कॉटलँड, पापुआ न्यू गिनी, कॅनाडा, नेपाळ, ओमान, नामिबिया. 






क्वालिफायरमध्ये  नामिबियाची शानदार कामगिरी -


क्वालिफायर स्पर्धेत नामिबियाने शानदार कामगिरी केली.  संपूर्ण स्पर्धेवर त्यांनी वर्चस्व गाजवलं. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा सात विकेटने पराभव केला. युंगाडाचा सहा विकेटने हरवले. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात रवांडा संघाचा 68 धावांनी धुव्वा उडवला. त्यानंतर केनियाला सहा विकेटने हरवले. तर पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात तंजानियाला 58 धावांनी हरवले.