ICC Men's T20 Wolrd Cup 2024 : टी 20 विश्वचषकाला अवघ्या महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिलाय. तीन ते चार दिवस भारतीय शिलेदारांची घोषणा होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील खेळाडूंबाबतची माहिती समोर आली आहे. ऋषभ पंत याला विकेटकीपर म्हणून संधी देण्यात येणार आहे. तर केएल राहुल दुसरा विकेटकीपर असेल. म्हणजेच, यंदाही विश्वचषकाच्या संघातून संजू सॅमसन याचा पत्ता कट झाला आहे. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचं स्थान निश्चित मानलं जातेय. एका जागेसाठी तीन जणांमध्ये स्पर्धा रंगली आहे. रिपोर्ट्सनुसार रवि बिश्नोई, अक्षर पटेल आणि आवेश खान यांच्यापैकी एकाला विश्वचषकाचं तिकिट मिळू शकतं.  


भारतीय कर्णधार रोहित शर्मा निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची भेट घेणार आहे, त्याआधीच काही खेळाडूंची नावं समोर आलेली आहेत.  27 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. या सामन्यानंतर अथवा सामन्याआधी रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांच्यामध्ये टी 20 विश्वचषकासाठी बैठक होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल याला बॅकअप विकेटकीपर म्हणून संघात स्थान मिळू शकतं. तर ऋषभ पंत याचं प्लेईंग 11 मधील स्थान निश्चित मानलं जातेय. ऋषभ पंत यानं दुखापतीनंतर शानदार कमबॅक केलेय. पंतने 9 सामन्यात 342 धावांचा पाऊस पाडलाय. विकेटमागेही पंत शानदार दिसलाय. 


संजू सॅमसन यानं यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. संजूच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये संजू सॅमसन यानं 314 धावांचा पाऊस पाडलाय. तर केएल राहुलने 302 धावा चोपल्या आहेत. पण संजू सॅमसनपेक्षा केएल राहुल याला विकेटकीपर म्हणून संधी दिली जाऊ शकते. गोलंदाजीमध्ये रवि बिश्नोई आघाडीवर आहे, कारण टीम इंडियाच्या मागील काही मालिकामध्ये त्यानं महत्वाची भूमिका बजावली आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये बिश्नोईला फक्त पाच विकेट घेता आल्यात. आवेश खान आणि अक्षर पटेल हे दोघेही स्पर्धेत आहेत.






यांची नावं जवळपास निश्चित- 


रोहित शर्मा, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह  


दरम्यान, यंदाचा विश्वचषकात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील मैदानात पार पडणार आहे. दोन जून पासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. सध्या जगभरातील बरेच खेळाडू आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवत आहे. पुढील काही दिवसांमध्ये टीम इंडियाचे 15 शिलेदार निवडले जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 किंवा 30 एप्रिल रोजी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ टी 20 विश्वचषकात उतरणार आहे.