IND vs PAK : टी 20 विश्वचषकाला बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिलेत. वॉर्मअप सामन्याला सुरुवातही झाली आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात 20 संघ सहभागी झाले असून स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. दोन जूनपासून विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरुवात होत आहे. पण 9 जून रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे क्रीडा विश्वाच्या नजरा खिळल्या आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडणार आहेत. विश्वचषकात भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार आहे, तर पाकिस्तानची धुरा बाबर आझमच्या खांद्यावर आहे. पण कोणता संघ वरचढ ठरेल, कुणाचे गोलंदाज दर्जेदार आहेत, तर कोणते फलंदाज शानदार लयीत आहेत.. याची चर्चा सुरु आहे. भारत आणि पाकिस्तान संघाचे विश्लेषण पाहूयात... 


भारतीय संघाचे विश्लेषण 


रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल टीम इंडियासाठी सलामीची जबाबदारी पार पडतील. आयपीएलमधील दोघांची कामगिरी पाहिली, तर सातत्य दिसत नाही. पण दोघांनीही यंदाच्या हंगामात शतक ठोकलेय. आयपीएलआधी झालेल्या अफगाणिस्तानविरोधातील मालिकेत दोघांनीही खोऱ्याने धावा जमवल्यात. दोघांची फलंदाजी टीम इंडियाची ताकद वाढवते. विराट कोहली यानं आयपीएलमध्ये 741 धावांचा पाऊस पाडलाय. हाच फॉर्म कायम राहिल्यास भारतीय संघाची जमेची बाजू ठरेल. विराट कोहली नेहमीच मोठ्या स्पर्धेत शानदार कामगिरी करतो, त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी महत्वाचा ठऱणार आहे. 


सूर्यकुमार यादव यानं दुखापतीनंतर कमबॅक केलेय. त्यानं आयपीएलमध्ये काही शानदार डाव खेळले आहेत. ऋषभ पंत यानेही शानदार कमबॅक केलेय. दुसराविकेटकीपर संजू सॅमसनही लयीत आहे.  अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांचा फॉर्म सध्या गायब असल्याचं दिसतेय. रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल संघात असणं म्हणजे टीम इंडियाची ताकद वाढणार आहे. जसप्रीत बुमराह वेगवान माऱ्याची धुरा संभाळणार आहे. बुमराह जगातील अव्वल गोलंदाजापैकी एक आहे. त्यानं नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत 20 विकेट घेतल्यात. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही जोडी फिरकीची ताकद वाढवते. दोघांनी आयपीएलमध्ये 34 विकेट घेतल्यात. बुमराहशिवाय अर्शदीप आणि मोहम्मद सिराज वेगवान मारा संभाळतील. एकूणच काय तर टीम इंडिया संतुलित दिसतेय.  


पाकिस्तान संघाचे विश्लेषण


पाकिस्तान संघाला गॅरी कर्स्टन यांच्या रुपाने नवे आणि अनुभवी कोच मिळाले आहेत.. त्यांनी 2011 वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. पण कर्स्टन आल्यानंतरही पाकिस्तान संघाची स्तिथी खराबच असल्याचे दिसतेय. आयर्लंडने नुकताच पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर आता इंग्लंडविरोधातही त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. 


पाकिस्तानच्या संघात बाबर आझम धावा करतोय, पण टी20 क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट चिंतेचा विषय ठरतोय. दुसरीकडे मोहम्मद रिझवान मागील काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नाही. त्याला दुखापतही झालेली आहे. आयर्लंडविरोधात त्यानं 56 आणि नाबाद 75 धावांची शानदार खेळी केली.   सॅम अय्यूब आणि आजम खान यासारखे विस्फोटक फलंदाजांनाही संघात स्थान दिलेय. पण आझम खान याचा फॉर्म पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय आहे.  मिडिल ऑर्डरमधील इफ्तिखार अहमद आणि फखर जमान यांचा अनुभव पाकिस्तानसाठी फायदाचा ठरु शकतो. इमाद वसीम याच्या कमबॅकमुळे अष्टपैलू डिपार्टमेंट मजबूत झालेय. मोहम्मद आमिर याला आयर्लंडविरोधात फक्त दोन विकेट घेता आल्या. त्याच्या गोलंदाजीची धार कमी झाली आहे. शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ ही तिकडी पुन्हा एकदा भेदक मारा करण्यासाठी सज्ज झालाय. 


कोण विजयी होणार ?


भारत आणि पाकिस्तान संघाच्या स्क्वाड आणि फॉर्म पाहिल्यास भारतीय संघाचं पारडे जड दिसतेय. भारतीय संघातील काही खेळाडू फॉर्ममध्ये नसतील, पण मोक्याच्या क्षणी ते फॉर्ममध्ये येतील. पाकिस्तानचा संघही तगडी फाईट देऊ शकतो. पण दबाव कोणता संघ झेलतो, त्यावरच विजेता ठरणार आहे. आकडेवारी पाहिल्यास भारतीय संघच 9 तारखेचा महामुकाबला जिंकेल, असं वाटतेय.